“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:09 IST2025-10-01T19:07:22+5:302025-10-01T19:09:24+5:30
Uddhav Thackeray PC News: सरकारने लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचा लाभ आधीच देऊन टाकावा. या पैशांतून लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना अशा कठीण परिस्थितीत आर्थिक मदत मिळेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
Uddhav Thackeray PC News: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून, सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. हातातून पीक गेलेले असताना त्यांच्याकडून कर्जवसुली केली जात आहे, हा प्रकार थांबवावा. तसेच सरकारने लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचा लाभ आधीच देऊन टाकावा. सरकारने निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने दोन ते तीन महिन्यांचे पैसे अगोदरच दिले होते, तसेच पैसे यावेळी द्यावेत. या पैशांतून लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना अशा कठीण परिस्थितीत आर्थिक मदत मिळेल, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पूर परिस्थिती, शेतकऱ्यांवर आलेले अस्मानी संकट आणि सरकारी मदत यांवरून महायुतीवर टीका केली. महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट आहे. अतिवृष्टीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सरकारला हात जोडून, राजकारण न आणण्याची आणि एकत्र येऊन मार्ग काढण्याची विनंती केली. मात्र, मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात व्यस्त तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नसतात आणि शेतकरी वाऱ्यावर पडला आहे. सध्या साखरसम्राट भाजपमध्ये गेले आहेत, त्यांचे कर्ज सरकार भरणार आहे. आता शेतकरी भाजपात आल्यानंतरच त्यांची कर्जमुक्ती करणार का? यासाठीच भाजपा मदत करायला थांबली आहे का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
सरकार काम करत नाही, कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे जावे
पूरग्रस्त भागातील शाळा तात्काळ सुरू करा, रोगराई पसरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील ८० कोटी लोकांना पंतप्रधान फुकटात अन्न धान्य देतात, पण जो हे सगळे पिकवतो तो आज उघड्यावर आला आहे. अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या आहेत, रस्ते वाहून गेले आहेत, सरकारने तातडीने लक्ष द्यावे. सरकार काम करत नाही, कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे जावे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी सरकारला केल्या. शेतकर्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे. तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाहीतर तुमच्या अकलीचा दुष्काळ म्हणा, काहीही म्हणा पण शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी ५० हजारांची मदत झाली पाहिजे, याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान, सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत असते. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे शब्दांचे खेळ चालतो. ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला. तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट कसे नाकारू शकता? ओला दुष्काळ ही संज्ञा नसेल म्हणून तुम्ही झालेले नुकसान नाकारू शकता का? काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.