मोफत वीज, स्वस्त घरं आणि महिलांसाठी १० रुपयांत जेवण; उबाठा-मनसे-राष्ट्रवादीचा संयुक्त 'वचननामा' जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:27 IST2026-01-04T14:25:44+5:302026-01-04T14:27:02+5:30
Shiv Sena UBT MNS NCP Joint Manifesto: वचननाम्यात मुंबईकरांसाठी सवलतींची आणि नव्या विकासकामांची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मोफत वीज, स्वस्त घरं आणि महिलांसाठी १० रुपयांत जेवण; उबाठा-मनसे-राष्ट्रवादीचा संयुक्त 'वचननामा' जाहीर
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना युबीटी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या 'महायुती'ने आपला संयुक्त वचननामा आज जाहीर केला. "मुंबईला कंत्राटदारांच्या हातातून सोडवून ती पुन्हा मुंबईकरांच्या हाती देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," असा निर्धार यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला.
या वचननाम्यात मुंबईकरांसाठी सवलतींची आणि नव्या विकासकामांची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
वचननाम्यातील महत्त्वाचे १० मुद्दे...
१. मोफत वीज आणि कर सवलत: 'बेस्ट'च्या घरगुती ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. तसेच ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (Property Tax) पूर्णपणे माफ केला जाईल.
२. हक्काची घरे: पालिका कर्मचाऱ्यांपासून मिल कामगारांपर्यंत सर्वांना हक्काची घरे दिली जातील. पुढील ५ वर्षांत १ लाख मुंबईकरांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
३. महिलांसाठी 'स्वाभिमान निधी': घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १,५०० रुपये मदत दिली जाईल. तसेच महिलांसाठी दर २ किमीवर सुसज्ज स्वच्छतागृहे आणि 'मासाहेब किचन'मधून १० रुपयांत जेवण मिळेल.
४. बेस्टचा कायापालट: बेस्टच्या ताफ्यात १० हजार इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील आणि महिला-विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जाईल.
५. आरोग्य सेवा: ५ नवीन मेडिकल कॉलेज आणि स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारले जाईल. जेनेरिक औषधे पालिकेच्या रुग्णालयात मोफत मिळतील.
६. तरुणांसाठी रोजगार: १ लाख तरुणांना स्वरोजगारासाठी १ लाखापर्यंत अर्थसाहाय्य आणि गिग वर्कर्सना ई-बाईकसाठी व्याजमुक्त कर्ज मिळेल.
७. शिक्षण: पालिका शाळांमध्ये १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाईल आणि 'बोलतो मराठी' उपक्रमातून मराठी भाषेचा प्रसार केला जाईल.
८. बिल्डरमुक्त मुंबई: रेसकोर्स, आरे जंगल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जमीन कोणत्याही बिल्डरला दिली जाणार नाही.
९. पेट फ्रेंडली मुंबई: पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र पार्क, ॲम्बुलन्स आणि श्मशानभूमीची सोय केली जाईल.
१०. IPL मध्ये मुंबईकरांना संधी: मुंबईत होणाऱ्या संगीत कार्यक्रम, IPL सामन्यांमध्ये १८ ते २१ वयोगटातील तरुणांसाठी १% तिकिटे मोफत राखीव असतील.