Coronavirus; मोदींच्या दिवे लावणीवरून विरोध अन् समर्थनाचे सूर; भाजपकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 01:34 AM2020-04-04T01:34:54+5:302020-04-04T06:33:58+5:30

दिवे बंद करण्यास ऊर्जामंत्र्यांचा विरोध

The tone of protest and support from PM Narendra Modi's lamp planting; Welcome from BJP | Coronavirus; मोदींच्या दिवे लावणीवरून विरोध अन् समर्थनाचे सूर; भाजपकडून स्वागत

Coronavirus; मोदींच्या दिवे लावणीवरून विरोध अन् समर्थनाचे सूर; भाजपकडून स्वागत

Next

मुंबई : घरांमधील सर्व दिवे नऊ मिनिटे बंद करून त्याऐवजी पणती, मेणबत्ती किंवा टॉर्च लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावरून विरोध आणि समर्थनाचेही सूर उमटले. हे आवाहन म्हणजे बालिशपणा आहे, अशी टीका ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली असून ५ एप्रिलला रात्री ९ वाजता कोणीही घरातील लाईट्स बंद करू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले की पंतप्रधानांची ही बाळबोध गोष्ट ऐकून निराशा झाली आहे. आज देशामध्ये कोरोनाचे संकट गंभीर स्वरूप धारण करीत असताना खंबीर उपायोजना करण्याचे सोडून पंतप्रधान टाळ्या वाजवा, थाळीनाद करा लाईट बंद करा, दिवे लावा अशा घोषणा देत सुटले आहेत. त्यांनी कोरोनाच्या संकटाचाही इव्हेंट चालविला आहे.

मोदी हे देशाचा प्रागतिक व पुरोगामी वारसा मागे नेत आहेत. वैज्ञानिक भूमिकेची गरज असताना दिवे लावा सांगणे म्हणजे प्रतिगामी बनणे आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ५ एप्रिलला एकजूट दाखवावी, असे आवाहन केले.

पंतप्रधान कधी जनतेला टाळ्या वाजवल्या सांगतात, तर कधी दिवे लावायला सांगतात. मात्र आज कोरोनाच्या काळात देशाची गरज काय आहे, जनतेला कुठल्या सुविधा आवश्यक आहेत, याचा ते विचार करणार आहेत का?
- बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टाळ्या वाजवायला सांगितले तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झाले. साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटापाण्याचं बोला.
- संजय राऊत, शिवसेना खासदार

मेणबत्ती, दिवे लावायला सांगितले. त्यामुळे कोरोनाची समस्या सुटणार आहे का? आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात ४० हजार गरजूंना धान्य वाटप करणार आहेत. अशाच प्रकारे पंतप्रधानांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना गरजूंना मदत करायला सांगणे अपेक्षित होते.
- विजय वडेट्टीवार, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन

पंतप्रधानांच्या आवाहनाला सर्वांनी साथ द्यावी

पंतप्रधानांच्या आवाहनाला सर्वांनी साथ द्यावी. ५ एप्रिल रोजीच्या लढ्यात एकजूट दाखवा. कोरोनामुळे आलेली निराशेची भावना घालवण्यासाठी सर्व नागरिकांनी ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता घरातील लाईट बंद करून पणत्या लावाव्यात.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

रोहित पवारांकडून स्वागत : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मात्र पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत केले आहे. दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोना व्हायरसविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसे असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे, असे ते म्हणाले.

Web Title: The tone of protest and support from PM Narendra Modi's lamp planting; Welcome from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.