Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोल वसुली बंद करू; राज्यमंत्री नाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:20 IST

Mumbai Pune Expressway Toll Suspended: मुंबई पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक कोंडी कायम आहे. अपघात होऊन २१-२२ तास लोटले तरी बोगद्याजवळ अपघातग्रस्त झालेला टँकर उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे महामार्गावर जवळपास २५ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

मुंबई पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला. आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजता हा टँकर उलटला. तेव्हापासून वाहतूक कोंडी झाली असून,  २१-२२ तासांनंतरही वाहतूक कोंडी कायम आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे हाल होत असून, राज्य सरकारकडून आता टोल वसुली थांबवण्यासंदर्भात पावले उचलण्यात आली आहेत. "वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोल वसूल करू नये असे असे मी लगेच सांगतो", असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले. 

एबीपी वृ्त्तवाहिनीशी बोलताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, "खरंतर हे सत्य आहे की, जे प्रवास करत आहेत, त्यांचे फार हाल होत असतील. मी काही वेळापूर्वी सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते सचिवांना बोललो आहे. त्यांना याबद्दल सखोल माहिती माझ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना द्यायची आहे. कारण एकदा माझ्यासोबतही घडलेलं. मी सुद्धा एकदा अडकलो होतो."

"माझं मत आहे की, वाहतुकीची कोंडी होण्यामागे तिथून वाहतूकही फार होते. मिसिंग लिंकचे काम मंदावले आहे. त्यामुळे तूर्तास मी गृहसचिवांना बोलणार आहे आणि लवकरात लवकर मार्ग मोकळा करू. हाल प्रचंड होत आहेत, हे वास्तव आहे", अशी माहिती त्यांनी दिली.  

लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक

"जी घटना घडली आहे, मागील २१-२२ तासांपासून, निश्चितपण माझे मत आहे की, हे चुकीचेच घडले आहे. लवकरात लवकरात तोडगा काढणे आवश्यक असल्यामुळे आम्ही पीडब्ल्यूडी आणि गृह सचिवांसोबत संपर्कात आहोत. त्यांनी सांगितले आहे की लवकरात लवकर मार्ग काढू. यावर कायमचा मार्ग काढणे आवश्यक आहे", अशी भूमिका त्यांनी मांडली. 

अशी परिस्थिती उद्भवलेली असताना देखील टोल वसूल केला जात आहे? अशा प्रसंगात टोल वसुली बंद करण्याची दक्षता तरी प्रशासनाने घ्यायला नको का? सरकारने तसे आदेश द्यायला नको का?, असा प्रश्न इंद्रनील नाईक यांना विचारण्यात आला. 

मंत्री इंद्रनील नाईक म्हणाले, "मी लगेच यावर कार्यवाही करायला लावतो लगेच. टोल घेऊ नये अशी सूचना द्यायला सांगतो", अशी माहिती त्यांनी दिली. 

२२ तासांनंतरही पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

आडोशी बोगद्याजवळ गॅस घेऊन जाणारा टँकर उलटला. ३ जानेवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. टँकरमधून गॅस गळती होत असल्याने वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. 

प्रवास करण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते? 

पहिला मार्ग :चांदणी चौक - ताम्हिणी घाट - रायगड मार्गे मुंबई (पुणे-पिरंगूट-पौड-मुळशी-ताम्हिणी घाट-वरचीवाडी-साजे-नांदगाव-पाली-पेडली-दूरशेत-उंबारे-पुणे मुंबई महामार्ग)

दुसरा मार्ग : आळे फाटा -माळशेज घाट- ठाणे मार्गे मुंबई

English
हिंदी सारांश
Web Title : Toll collection halted on Mumbai-Pune Expressway until traffic flow resumes.

Web Summary : Following a tanker accident causing massive congestion on the Mumbai-Pune Expressway, the state government is considering suspending toll collection. Minister Indraneel Naik stated that he has instructed officials to explore this option and find a solution to the traffic issue, also suggesting alternative routes for commuters.
टॅग्स :मुंबई-पुणे एक्सप्रेस वेअपघातपोलिसवाहतूक पोलीसवाहतूक कोंडीमहामार्ग