१३९ हेल्पलाईनवर संपर्क साधून तिकिटांचा परतावा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 06:23 PM2020-04-21T18:23:03+5:302020-04-21T18:23:37+5:30

रद्द करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसचे ऑनलाईन तिकिटांचा परतावा रेल्वेकडून देण्यात येत आहे.

Tickets will be refunded by contacting the helpline at 139 | १३९ हेल्पलाईनवर संपर्क साधून तिकिटांचा परतावा मिळणार

१३९ हेल्पलाईनवर संपर्क साधून तिकिटांचा परतावा मिळणार

Next

 

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व प्रवासी रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात तिकीट काढलेल्या प्रवाशांचा प्रवास रद्द झाला. परिणामी, त्यांना तिकिटाचा परतावा मिळत आहे. रद्द करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसचे ऑनलाईन तिकिटांचा परतावा रेल्वेकडून देण्यात येत आहे. यासह आता तिकिट खिडकीवर काढलेल्या रेल्वे तिकिटांचा परतावा रेल्वेच्या १३९ या हेल्पलाइन वरून मिळणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. 

लॉकडाऊनच्या पार्श्ववभूमीवर रेल्वे मंत्रालयाने प्रीमियम, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, उपनगरीय गाड्या, कोलकाता मेट्रो रेल, कोकण रेल्वे सेवा ३ मे पर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, ज्या प्रवाशांनी तिकीटे ऑनलाईन आरक्षित केली होती. त्यांच्या बँक खात्यात परताव्याची रक्कम स्वयंचलितपणे पाठविली जात होती. ज्यांनी तिकीट खिडकीवर तिकीट आरक्षित केले होते. त्यांना तिकीट परतावा मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. कारण सर्व आरक्षण केंद्रे बंद होती. त्यामुळे आय‌आरसीटीसीने नवीन योजना आखली आहे. त्यानुसार रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ वरुन काही पर्याय वापरताच परताव्याची रक्कम स्वयंचलितपणे प्रवाशाच्या खात्यात वळविण्यात येणार आहे,  अशी माहिती आय‌आरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी दिली.

आतापर्यंत देशभरात १ कोटी ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी तिकीटे रद्द केली असून त्याबदल्यात ७२५ कोटी रुपये परताव्याची रक्कम प्रवाशांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आय‌आरसीटीसीच्या  वेबसाईट लिंकवरूनही तिकीटे रद्द करता येऊ शकतात. प्रवाशांना ३१ जुलै २०२० पर्यंत काढलेल्या तिकिटांचा परतावा मिळणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.  

Web Title: Tickets will be refunded by contacting the helpline at 139

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.