"...त्याची पण चौकशी करणार होतात, काय झालं?", मेट्रो अपघात प्रकरणावरून मनसेचे सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:24 IST2026-02-16T16:23:08+5:302026-02-16T16:24:51+5:30
मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिकेचा कठडा कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणावरून मनसेने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.

"...त्याची पण चौकशी करणार होतात, काय झालं?", मेट्रो अपघात प्रकरणावरून मनसेचे सरकारला सवाल
मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये भयंकर अपघात झाला. मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असून, एक कठडा कार आणि रिक्षावर कोसळला. रिक्षाचा चेंदामेंदा होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जखमी झाले आहे. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, या घटनेने अनेक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच राज्य सरकारकडून मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत केल्यावरून मनसेने अनेक सवाल केले आहेत.
मनसेने म्हटले आहे की, "मुंबई मेट्रो ४ वडाळा-ठाणे-कासारवडवलीच्या मार्गिकेच्या कामाच्या दरम्यान अडीच मेट्रिक टनाचा एक कठडा कोसळून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. यावर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची नुकसान भरपाई घोषित केली आणि याची चौकशी होईल असं सांगून नेहमीप्रमाणे जबाबदारी ढकलून दिली. मुळात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं मोल हे ५ लाख अस सरकार ठरवून स्वतःची जबाबदारी झटकू कसं शकतं?", असा संतप्त सवाल मनसेने राज्य सरकारला केला आहे.
"ऑगस्ट २०२५ मध्ये भिवंडी मेट्रो लाईन ५ च्या कामात एक सळई कोसळली आणि ती एका रिक्षावर पडली आणि त्यात २० वर्षाच्या मुलाचा हकनाक जीव गेला. त्यावर सरकारने चौकशी करू सांगितलं? काय चौकशी झाली?", असे म्हणत मनसेने राज्य सरकारला घेरले.
"नोव्हेंबर मेट्रो ९ च्या लाईनच्या कामात ४२ वर्षांचा एक प्रोजेक्ट सुपरव्हायजर वरून कोसळला आणि मृत्युमुखी पडला. त्याची पण चौकशी होणार होती त्याचं काय झालं?", असा सवालही मनसेने सरकारला केला आहे.
"डिसेंबर २०२३ मध्ये मेट्रोच्या कामातच ठाण्यात ३३ वर्षांचा एक मजूर पडून मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला. त्याची चौकशी कधी झाली?", असा खडा सवाल मनसेने केला आहे.
मुंबई मेट्रो ४ वडाळा-ठाणे-कासारवडवलीच्या मार्गिकेच्या कामाच्या दरम्यान अडीच मेट्रिक टनाचा एक कठडा कोसळून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. यावर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची नुकसान भरपाई घोषित केली आणि याची चौकशी होईल असं सांगून नेहमीप्रमाणे जबाबदारी ढकलून दिली. मुळात एखाद्या… pic.twitter.com/Ho2kO6VIQh
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 16, 2026
"जानेवारी २०२३ मध्ये पूर्वद्रुतगती मार्गावर ३३ वर्षांची एक भंगार गोळा करणारी व्यक्ती मेट्रोची एक लोखंडी पट्टी अंगावर पडून चिरडला गेला आणि मृत्युमुखी पडला. त्याची पण चौकशी करणार होतात, काय झालं? चौकशी हा फार्स आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतं. ना चौकशी होते, ना कंत्राटदार सुधारतात ना सरकार त्यांच्यावर जरब बसवते", अशा शब्दात मनसेने राज्य सरकारला सुनावले आहे.