...तेव्हा विरोधकांची भूमिका महत्त्वाची ठरेल; मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष एकसंघ राहणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 05:56 IST2026-02-08T05:55:33+5:302026-02-08T05:56:01+5:30
निवडणूकपूर्व आणि नंतर राजकीय समीकरणे बदलल्याने चर्चा, २०१७ मध्ये भाजपा उद्धवसेनेचे बिनसल्याने सत्तेत सहभागी न होता भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका पार पडणे पसंत केले होते.

...तेव्हा विरोधकांची भूमिका महत्त्वाची ठरेल; मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष एकसंघ राहणार का?
जयंत होवाळ
मुंबई - पालिका निवडणुकीत यंदा भाजपा आणि शिंदेसेना एकत्र आले होते तर उद्धवसेना आणि मनसे यांची युती झाली होती. निकालानंतर भाजपा-शिंदेसेना युती सत्तेवर येणार आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या एकमेव नगरसेवकाने मात्र शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे तर अन्य पक्ष विरोधी पक्षात बसणार आहेत. आता उद्धवेसना हा प्रमुख विरोधी पक्ष असला, तरी त्याच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे विरोधी पक्षातील अन्य पक्ष एकसंध राहणार का? असा प्रश्न आहे.
२०१७ मध्ये भाजपा उद्धवसेनेचे बिनसल्याने सत्तेत सहभागी न होता भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका पार पडणे पसंत केले होते. दरम्यानच्या काळात मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी उद्धवसेनेत प्रवेश केला होता. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम आणि समाजवादी पक्षाने विरोधी पक्षात राहूनही अप्रत्यक्षपणे उद्धवसेनेला साथ दिली होती. त्यामुळे उद्धवसेनेने पाच वर्षाचा कार्यकाळ विनासायास पूर्ण केला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीपूर्वी आणि नंतर सगळी गणिते बदलली आहेत.
उद्धवसेनेला दिलासा
मनसेने निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेसोबत युती केली होती. कल्याण - डोंबिवली महापालिकेत मनसेने महायुतीला साथ दिल्यामुळे मुंबई महापालिकेतील त्यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र मुंबईत भाजपला पाठिंबा देणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्धवसेनेला निश्चितच दिलासा मिळाला असेल.
...तेव्हा विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार
काँग्रेसने या निवडणुकीत वंचितसोबत युती केली होती. काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. विरोधी बाकावर बसल्यानंतर या पक्षाचे उद्धवसेनेसोबत कसे सहकार्य राहील, तेही महत्त्वाचे असेल. एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र राज्यातील अन्य नगरपरिषदांमध्ये त्यांचे भाजपसोबत असलेले तथाकथित सख्य चर्चेत आल्यामुळे मुंबई महापालिकेत या पक्षाची भूमिका काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
समाजवादी पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले असून, हा पक्ष विरोधी बाकावर बसला तरी प्रमुख विरोधी पक्ष उद्धवसेना आणि त्यांच्यात किती जुळून येईल, याकडेही लक्ष लागेल. राष्ट्रवादी (अजित पवार) चे तीन नगरसेवक निवडून आले असून, हा पक्ष विरोधात बसणार की सत्ताधाऱ्यांना साथ देणार, हे अजून गुलदस्त्यात आहे.
या पक्षाचे नगरसेवक आमचे सहयोगी म्हणून काम करतील, असा दावा शिंदेसेना करत असली, तरी त्या पक्षाची भूमिका स्पष्ट झालेली नाही. या पार्श्वभूमीवर सभागृहात किंवा विविध समित्यांमध्ये जेव्हा महत्त्वाचे प्रस्ताव चर्चेला किंवा मंजुरीसाठी येतील, तेव्हा विरोधी पक्षातील विविध पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विरोधक एकसंधपणे सत्ताधाऱ्यांचा सामना करणार का? याकडे लक्ष असेल.