...तर बरं झालं असतं; धनंजय मुंडेंचं अजितदादांच्या बंडावर सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 15:32 IST2019-11-27T15:03:57+5:302019-11-27T15:32:34+5:30
अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळलं.

...तर बरं झालं असतं; धनंजय मुंडेंचं अजितदादांच्या बंडावर सूचक विधान
मुंबईः अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळलं. त्यामुळे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला असून, उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण अजित पवार जेव्हा भाजपाच्या कंपूत सहभागी झाले होते, तेव्हा राष्ट्रवादीचे अनेक नेते कोणती भूमिका घ्यायची, या संभ्रमात होते. त्या सगळ्या घटनाक्रमावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बीबीसी मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.
काही गोष्टी झाल्या नसत्या तर बरं झालं असतं. सकाळी हा शपथविधी झाला. शपथविधी झाला ते मला माहीतच नव्हतं. रात्री दोन वाजता येऊन मी मित्राच्या घरी थांबलो होतो. दुपारी 1 वाजता उठलो, त्यावेळी समजलं असं काही तरी झालं आहे. तोपर्यंत मला कोणी उठवलं नाही. चार वाजता बैठक होती तिकडे गेलो. मी पक्षासोबत आणि पक्ष नेतृत्वासोबत आहे. तुम्हाला आता कुठे आलबेल दिसत नाही ते सांगा. दादांनी राजीनामा दिला तो विषय संपला. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं, मी राष्ट्रवादीचाच नेता आहे. मी साहेबांनाच नेता मानतो आहे.
भाजपसोबत युती तोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तास्थापनेचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्याच्या एक दिवस आधीच अजित पवारांनी राजीनामा देऊन घरवापसी केली.