राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून; एक्सप्रेस वेवरील अपघातावर एकनाथ शिंदेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 20:29 IST2023-06-13T20:29:26+5:302023-06-13T20:29:45+5:30
राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून; एक्सप्रेस वेवरील अपघातावर एकनाथ शिंदेंची माहिती
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एका केमिकल टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो रस्ता दुभाजकाला धडकला. यामध्ये केमिकलने पेट घेतल्याने संपूर्ण टँकर जळून खाक झाला आहे. तर पेटत्या टॅकरमधून केमीकल व आगीचे लोट पुलाच्या खाली पडले व पेट घेतला. या घटनेत एकूण चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
केमिकल टँकर पलटी झाल्यामुळे त्याच्यातलं केमिकल पुलाखालच्या रस्त्यावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर पडलं, तसंच काही वाहनांवरही सांडलं, ज्यामुळे पुलाखालील वाहनांनी पेट घेतला. दरम्यान, आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 13, 2023
या घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम मिळावा,…
दरम्यान, अग्निशमन दलाची पथके देखील घटनास्थळी दाखल झाली व आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले. त्यातच पाऊस देखील आल्याने आग विझविण्यास मदत झाली. अतिशय भयंकर अशी ही घटना असून संपूर्ण परिसरास आगीचे लोट पहायला मिळत होते. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेस वे बंद करण्यात आला होता. दुपारी दिडनंतर आग नियंत्रणात आल्यानंतर पुण्याचे दिशेने जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती.