'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:30 IST2025-11-04T19:28:57+5:302025-11-04T19:30:09+5:30
Local Body Election Maharashtra: मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका पुढे ढकलला अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. पण, राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या.

'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
Local Body Election Maharashtra MNS: "ही जी निवडणूक आहे, ती लोकशाहीला अनुसरून नाही. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो. ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत, त्या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्त वाटते", असे सांगत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला उलट प्रश्न करत इशाराही दिला.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
संदीप देशपांडे म्हणाले, "आम्ही काय सांगितलेलं की, निवडणुका पारदर्शी होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. जर निवडणुका पारदर्शीपणे होत नसेल, तर ती सुद्धा जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे ना?", असा सवाल त्यांनी केला.
दोनदा मतदान करणाऱ्यांना आयोग कसे रोखणार?
संदीप देशपांडे यांनी दुबार मतदारांच्या मुद्द्यावर बोट ठेवत काही प्रश्न निवडणूक आयोगाला केले. ते म्हणाले, "ते जे सांगत आहेत की, दुबार मतदार असलेल्यांना डबल स्टार करणार आहेत. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेणार आहेत की, दुसरीकडे मतदान करणार नाही. अरे पण त्याने केलं; तर ते रोखण्याची कुठली यंत्रणा निवडणूक आयोगाकडे आहे का? असल्यास ती यंत्रणा काय आहे? याचं उत्तर आजच्या पत्रकार परिषदेत मिळालेले नाही."
निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही
"जे बोगस मतदार आहेत, जसे की एका पत्त्यावर शंभर-पन्नास मतदारांची नोंदणी झालेली आहे. काही लोकांचे घर क्रमांक नाहीत. काही लोकांचे फोटो नाहीत. काही लोकांची नावे विचित्र भाषेत लिहिलेली आहेत. त्या मतदारांचे काय करणार आहे, याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिलेले नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुका निव्वळ एक फार्स आहे", असा संताप संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला.
"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामागे लपण्याचे काम निवडून आयोग करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने असे कधीही सांगितले नाही की, तुम्ही सदोष मतदारयांद्यावर निवडणुका घ्या", अशी टीका देशपांडे यांनी केली.
संदीप देशपांडे यांचा निवडणूक आयोगाला इशारा
"आता निवडणुका घोषित झाल्या आहेत. यावर काय कायदेशीर कारवाई करायची असेल, ते आमचे पक्षाचे नेते मंडळी ठरवतील. पण, एक मात्र नक्की सांगतो. जिथे जिथे बोगस मतदार दिसतील, चुकीचे मतदार दिसतील, त्यांना जी राज ठाकरेंनी सांगितली आहे, ती ट्रीटमेंट देण्याचे काम आमचे महाराष्ट्र सैनिक करतील हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावे", असा इशारा संदीप देशपांडे यांनी आयोगाला दिला.