Join us
Daily Top 2Weekly Top 5

"धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला, न्यायदेवते त्यांना...", 'तो' फोटो अन् संजय राऊतांना संताप अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 19:22 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहेत. या प्रकरणाची सुनावणी दोन-तीन दिवसांपूर्वी सुरू होणार होती, पण ती लांबणीवर गेली. अशातच सरन्यायाधीश सूर्य कांत महाराष्ट्रात दौऱ्यावर असून, त्यांचा हा दौरा राजकीय दृष्टीने चर्चेचा ठरला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आगमन झाल्यापासूनच राजकीय दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयातर्फे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरन्यायाधीशांसोबतचा फोटो उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला असल्याचे म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केला. 

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातर्फे न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी गणेशाची मूर्ती देऊन त्यांचे सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं. 

खासदार राऊत म्हणाले, 'न्यायदेवते त्यांना क्षमा कर'

सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अभिनंदन करत आहेत, असा फोटो खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

हा फोटो पोस्ट करत संजय राऊत म्हणाले, "धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला!! न्यायदेवते त्यांना क्षमा कर! हे राम!", अशा शब्दात राऊतांनी आपला संताप व्यक्त केला. 

खासदार राऊतांनी शुक्रवारीही एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांचे विमानतळावर जाऊन स्वागत करतानाची पोस्ट रिपोस्ट करत सवाल उपस्थित केला होता. शिंदेंनी सरन्यायाधीशांचा स्वागत करतानाच्या फोटोवर राऊत म्हणालेले की, "म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!"

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाची सुनावणी लांबणीवर

शिवसेनेतील फुटीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण, पक्षाचे नाव शिंदे गटाला दिले. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला नवीन नाव आणि चिन्ह मिळाले. 

तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला मिळाले, तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला नवीन नाव आणि चिन्हासह निवडणुकांना सामोरं जावं लागत आहे. 

या दोन्ही पक्षाच्या नावाचा आणि चिन्हाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. मागील तीन वर्षांपासून या प्रकरणांवरील सुनावणीच प्रलंबित आहे. बुधवारपासून (२१ जानेवारी) ही सुनावणी सुरू होणार होती. ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut Outraged as Court Case Outcome Suspected After Leaders' Photo

Web Summary : Sanjay Raut expressed outrage after seeing a photo of Chief Justice Suryakant with Eknath Shinde and Ajit Pawar. He suggested the Shiv Sena and NCP symbol case outcomes were predetermined, questioning judicial fairness due to ongoing delays.
टॅग्स :संजय राऊतसर्वोच्च न्यायालयएकनाथ शिंदेअजित पवारशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस