संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:06 IST2025-05-02T12:05:13+5:302025-05-02T12:06:58+5:30

Sanjay Raut News: पुलवामा, पहलगाम येथे जे झाले, त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. पंतप्रधानांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यायला हवा, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

thackeray group mp sanjay raut slams opposition and central govt over pahalgam terror attack | संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”

संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”

Sanjay Raut News: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात २७ लोक मारले गेले. पंतप्रधान मोदी हे बिहार दौऱ्यावर प्रचारासाठी जात आहेत. ते इतर ठिकाणी गेले. ते मुंबईत आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही. ते बॉलिवूड अभिनेत्यांसोबत, अभिनेत्रींसोबत ९ तास होते. टाळ्या वाजवत होते. देशावर हल्ला झाला असताना ते हा कार्यक्रम रद्द करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएची एक विशेष टीम अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचली असून, यात बैसरन खोऱ्याची थ्रीडी मॅपिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि हल्ल्यानंतर कुठल्या मार्गाने पळ काढला, याचा शोध घेतला जात आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढलेला असतानाच जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारताने सिंधू जलकरार रद्द केल्याच्या रात्रीपासून म्हणजेच २४ एप्रिलपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे, अशी माहिती जम्मू येथील संरक्षण प्रवक्त्यांनी दिली. यावरून आता खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुण आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

इंदिरा गांधी यांनी जबाबदारी घेतली

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याबाबत जनरल मानकेशॉ यांना थेट विचारले होते की, तुम्हाला हल्ला करण्यासाठी किती दिवस लागतील. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानवर हल्ला करायचा आहे. हे नेतृत्व गुण असतात. इंदिरा गांधी यांनी जबाबदारी घेतली. इंदिरा गांधी यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली. तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे का, पंतप्रधानांमध्ये राजकीय नेतृत्व गुण नाही. जे होईल, त्याची जबाबादारी घेण्याची कुवत नाही. हे पोकळ नेतृत्व आहे.  लष्काराला कारवाईसाठी मुभा दिली. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळू असा हा प्रकार आहे. म्हणजे युद्धात उजवे ठरलो तर श्रेय घेण्यासाठी हे पुढे येतील. तर चूक झाली तर सैन्यावर खापर फोडतील. श्रेयासाठी पुढे आणि गडबड झाली तर मी तुमच्यावर विश्वास टाकला होता, असे म्हणून ते नामनिराळे होतील, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

युद्ध सुरू करा, आम्ही सरकारच्या बरोबर आहोत

पुलवामा, पहलगाम येथे जे झाले, त्याला तुम्ही जबाबदार आहात. देशाचे केंद्रीय गृहमंत्री जबाबदार आहेत. ही गोष्ट विरोधकांनी लक्षात घेतली पाहिजे. विरोधक सरकारला कसले समर्थन देत आहेत. समर्थन द्यायचे असेल, तरी द्या, पण आधी अमित शाह यांचा राजीनामा घ्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. युद्ध सुरू करा, आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. पण सरकार सगळ्या गोष्टींचे राजकारण करत आहे. सरकारला समर्थन म्हणजे कमजोरीला समर्थन, उडाणटप्पूपणाचे समर्थन आणि टपोरीपणाचे समर्थन आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

दरम्यान, देशाच्या सीमा या जवानांमुळे सुरक्षित आहेत. सरकारमुळे नाही. ज्यांना सरकारला समर्थन द्यायचे त्यांनी द्यावे, ते जनतेच्या भावनांशी खेळत आहेत.  गृहमंत्री अमित शाह या घटनेला जबाबदारी असतील तर त्यांचा राजीनामा पंतप्रधानांनी घ्यायला हवा. मी आमची भूमिक मांडत आहे. मुंबईवर हल्ला झाल्यानंतर शिवराज पाटील, आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेतला होता. काँग्रेसने विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला होता. जनभावनेचा आदर करत हे राजीनामे घेण्यात आले, मग आता अमित शाह यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी केली.

 

Web Title: thackeray group mp sanjay raut slams opposition and central govt over pahalgam terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.