“आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”; योगेश कदमांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:18 IST2025-02-28T13:17:39+5:302025-02-28T13:18:15+5:30
Thackeray Group Sanjay Raut News: एकनाथ शिंदेंना ज्ञानपीठ पुरस्कारही देऊ शकतात, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.

“आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”; योगेश कदमांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा संताप
Thackeray Group Sanjay Raut News: पुण्यात अशा गोष्टी का घडत आहेत? कायद्याचा धाक राहिला आहे का? पोलिसांची भीती राहिली आहे, असे दिसत नाही. राजकीय वरदहस्त लाभलेले गुन्हेगार मोकाट सुटतात, जे गुन्हेगार असतात त्यांना कोणताही पक्ष नसतो. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ठाण्यातील बदलापूर अत्याचाराच्या घटनेत जेव्हा अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला तेव्हा निवडणुका होत्या, आता निवडणुका नाहीत. तो ठाणे जिल्हा होता, आता पुणे जिल्हा आहे, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वारगेट पुणे घटनेवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात तीन दिवसांनंतर अखेर पोलिसांना यश आले आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आरडाओरडा केला नाही म्हणून अत्याचार झाला. विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो. काहीतरी दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची आपल्याला माहिती आहे. परंतु, अशावेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतेही आरडाओरडा, कुठलेही फोर्स, असे काही घडलेले नाही, असे बेजबाबदार वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही योगेश कदम यांच्यावर टीका केली.
आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत
पुणे पोलिसांनी आणि सरकारने आरोपीला अटक केले म्हणजे फार उपकार केले नाहीत. स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये अत्याचाराची घटना घडते आणि त्या घटनेवर बोलताना गृहराज्यमंत्री काय बोलतात? ते म्हणाले की सर्व घटना शांततेत घडल्यामुळे बाहेर काही कळले नाही. गृहराज्यमंत्र्यांची ही अशी भूमिका? एका मुलीवर अत्याचाराची घटना घडते आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की तिने फोर्सफुली किंवा स्ट्रगल केले नाही. अशा पद्धतीचा शब्द त्यांनी वापरला. खरे म्हणजे आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक, लेखक, कवी, संत आहेत. यापेक्षा अजून काही पदवी द्यायची असेल तर देऊ. एकनाथ शिंदे अशा पदव्या विकत घेऊ शकतात. आमदार आणि खासदार जसे विकत घेतले जातात त्या प्रकारे साहित्यिक, लेखक, कवी या पदव्या जर एकनाथ शिंदेंना हव्या असतील तर ते त्या पदव्या विकत घेऊ शकतात. एकनाथ शिंदे यांना अमित शाह अजून पुरस्कार देऊ शकतात. एवढेच नाही तर ते एकनाथ शिंदेंना ज्ञानपीठ पुरस्कार देऊ शकतात, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.