Thackeray Cabinet changes within 48 hours, NCP leaders' ministry department changes | ठाकरे मंत्रिमंडळात अवघ्या 48 तासांत बदल, राष्ट्रवादीच्या नेत्यांची खाती बदलली
ठाकरे मंत्रिमंडळात अवघ्या 48 तासांत बदल, राष्ट्रवादीच्या नेत्यांची खाती बदलली

मुंबई - महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 15 दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप केले. सहा मंत्र्यांकडे 54 खात्यांची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडे महसूल, राष्ट्रवादी काँग्रेसकडे जलसंपदा तर शिवसेनेकडे गृह आणि नगरविकास ही महत्वाची खाती आली आहेत. मात्र, अवघ्या 48 तासांतच मंत्रिमंडळातील खातेवाटपांत काही बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील व छगुन भुजबळ यांच्या खात्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. 

खाते वाटपामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या गृह खाते देण्यात आले असले तरी विस्तारानंतर हे खाते राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे कोणतेही खाते ठेवलेले नसले तरी कोणत्याही मंत्र्यांकडे न देण्यात आलेली सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय ही खाती ठाकरे यांच्याकडे असणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेअंती खाते वाटपावर सहमती झाली. त्यानुसार छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांच्याकडे खालील खात्यांचा पदभार देण्यात आला होता, त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. त्यास, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मंजुरी दिली आहे. 


छगन भुजबळ : ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
जयंत पाटील : वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

खातेवाटपातील बदल - 

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांच्याकडे तर अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे. हा एकमेव बदल खातेवाटपात करण्यात आला आहे. 
 

Web Title: Thackeray Cabinet changes within 48 hours, NCP leaders' ministry department changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.