शहापूरच्या सापगावातील दहा जणांचा लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:18 IST2020-11-22T09:18:09+5:302020-11-22T09:18:09+5:30

ठाणे : कोरोनाचे संकट सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील सापगाव येथील १० ग्रामस्थांचा २० दिवसांत लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ...

Ten people from Sapgaon in Shahapur died of leptospirosis | शहापूरच्या सापगावातील दहा जणांचा लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू

शहापूरच्या सापगावातील दहा जणांचा लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू

ठाणे : कोरोनाचे संकट सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील सापगाव येथील १० ग्रामस्थांचा २० दिवसांत लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनीष रेघे यांनीही हे मृत्यू लेप्टोस्पायरोसीसनेच झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

शहापूर या आदिवासी तालुक्यातील दुर्गम भागात सापगाव हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत १० जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने ठाणे जिल्हा परिषद खडबडून जागी झाली आहे. शुक्रवारी आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील व डॉ. रेघे यांनी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांची आरोग्यतपासणी सुरू केली आहे. त्यात डेंग्यूच्या तुलनेत लेप्टोस्पायरोसीस या आजाराची लक्षणे जास्त आढळून आली आहेत. तेथे त्वरित आरोग्य शिबिर सुरू करून ग्रामस्थांवर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसीसचे उपचार सुरू केल्याचे डाॅ. रेघे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

या २० दिवसांच्या कालावधीत दगावलेल्यांमध्ये तरुणांसह ४० ते ४५ वयाचे नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. ग्रामस्थांना विविध साथीच्या आजारांनी ग्रासल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषद सदस्या वंदना भांडे यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करून उपचार सुरू करण्याची मागणी लावून धरली. त्यास अनुसरून आता या गावात आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन युद्धपातळीवर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, माजी आमदार पांडुरंग बरोरा, उपसभापती जगन पष्टे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, शहापूर आरोग्य अधिकारी तरुलता धानके, ज्येष्ठ नेते किशनशेठ भांडे, काशिनाथ तिवरे, विलास गगे, नीलेश भांडे, विनायक सापळे, मनोज धानके आदी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Ten people from Sapgaon in Shahapur died of leptospirosis