शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 06:49 IST2025-12-06T06:48:01+5:302025-12-06T06:49:30+5:30
Teacher Strike: सुधारित संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळांमध्ये एका तुकडीत विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी झाल्यास त्या तुकडीत शिक्षक पदच उपलब्ध होणार नाही.

शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
मुंबई : ८०० पेक्षा अधिक शाळांमधीलशिक्षकांनी संच मान्यतेच्या निकषात बदल करावेत, सर्वांना सक्तीची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लागू करू नये, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन केले. संघटनांनी एकत्र येत शिक्षण विभागाला निवेदने दिली. पालिका, विनाअनुदानित शाळा सुरू असल्यामुळे मुंबईत संमिश्र चित्र दिसले.
सुधारित संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळांमध्ये एका तुकडीत विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी झाल्यास त्या तुकडीत शिक्षक पदच उपलब्ध होणार नाही. राज्यातील ८ हजार शाळांमध्ये एक किंवा दोनच शिक्षक राहतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होईल. विशेषतः ग्रामीण भागात फटका बसेल, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.
अनेक शिक्षक एकत्र
मुंबईत शिक्षक भारती संघटनेच्या अध्यक्षा कल्पना शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांना निवेदन देण्यात आले. तर शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षक आ. ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक मुक्तार शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पश्चिम विभागात पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांच्या पुढाकारात शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांना निवेदन दिले.
मागणी काय आहे?
शिक्षकांनी २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांवर टीईटीची सक्ती करू नये, अशी ठाम मागणी केली. त्यांचे म्हणणे आहे की टीईटीची अट २०१३ पासून लागू असल्याने त्या पूर्वीच्या शिक्षकांना ती लादणे योग्य नाही. दरम्यान, आंदोलनामुळे अनेक अनुदानित खासगी शाळा बंद राहिल्या.