शिक्षक रिक्षा चालवून देता आहेत रुग्णसेवा, ऑनलाइन शिक्षण, मोफत रुग्णसेवेची दुहेरी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:46 AM2021-05-13T10:46:45+5:302021-05-13T10:50:32+5:30

रुग्णवाहिकांचे न परवडणारे दर, त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी केंद्र किंवा रुग्णालयात पोहोचण्यास होणारा उशीर, त्यांची होणारी हेळसांड पाहून शाळांचे ऑनलाइन वर्ग संपल्यावर सावंत यांनी या रुग्णांसाठी आपल्या रिक्षातून मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला.

Teachers are driving rickshaws to provide ambulance service, online education, free ambulance service | शिक्षक रिक्षा चालवून देता आहेत रुग्णसेवा, ऑनलाइन शिक्षण, मोफत रुग्णसेवेची दुहेरी जबाबदारी

शिक्षक रिक्षा चालवून देता आहेत रुग्णसेवा, ऑनलाइन शिक्षण, मोफत रुग्णसेवेची दुहेरी जबाबदारी

Next

मुंबई : एकीकडे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देऊन त्यांची चांगल्या समाजासाठी जडणघडण करायची आणि दुसरीकडे समाजसेवेचे व्रत म्हणून सध्याच्या कठीण परिस्थितीत गरीब, गरजू कोविड रुग्णांना रुग्णालयात, कोविड केंद्रात पोहोचविण्याची दुहेरी जबाबदारी पेशाने शिक्षक असलेले दत्तात्रय सावंत पार पाडत आहेत.

रुग्णवाहिकांचे न परवडणारे दर, त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी केंद्र किंवा रुग्णालयात पोहोचण्यास होणारा उशीर, त्यांची होणारी हेळसांड पाहून शाळांचे ऑनलाइन वर्ग संपल्यावर सावंत यांनी या रुग्णांसाठी आपल्या रिक्षातून मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला. मागील लॉकडाऊनपासून ते आजतागायत त्यांनी ४० हून अधिक कोविड रुग्णांना रुग्णालय, कोविड केंद्रांत पोहोचविण्याचे आणि इतर रुग्णांना आवश्यक स्थळी पोहोचविण्याचे काम अविरत सुरू ठेवले आहे.

दत्तात्रय सावंत मागील १५ वर्षांपासून घाटकोपरच्या ज्ञानसागर विद्यामंदिर या अंशतः अनुदानित शाळेमध्ये इंग्रजी हा विषय माध्यमिक विद्यार्थ्यांना शिकवतात. अंशतः अनुदानित शाळा असल्यामुळे मागील ३ वर्षांपासून त्यांना पोटापुरते वेतन मिळण्याची व्यवस्था होत आहे. त्यामुळे घर चालविण्यासाठी ते याआधीही पार्टटाइम नोकरी म्हणून रिक्षा चालवत होते. 

एके दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास आईच्या वयाच्या आजारी बाईंना रुग्णालयात जाण्यासाठी काहीच सेवा उपलब्ध होत नाही, हे पाहून अशा गरीब, गरजू लोकांसाठी आपणच सेवा द्यायची, असा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयाला त्यांची पत्नी ज्या स्वतःही विशेष शिक्षिका आहेत त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर शाळांचे वर्ग ऑनलाइन झाल्यावर, थोडा आराम करून मग सावंत यांनी आपली रिक्षा सेवा कोविड रुग्णांना देण्यास 
सुरुवात केली. 

...ताेपर्यंत सेवा अविरत सुरू राहणार!
रुग्णांना आपल्या रिक्षातून सेवा देण्याच्या दरम्यान ते कोविड संदर्भातील सर्व अत्यावश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात. रुग्णांना सेवा देताना ते स्वतः पीपीई किट, हॅण्डग्लोव्हज, मास्क, सॅनिटायजर या सर्व गोष्टींचा वापर करतात. याशिवाय त्यांच्याकडे ऑक्सिमीटर, पल्समीटरही असून दरराेज संपूर्ण रिक्षा सॅनिटाईज करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या संकटातून केवळ देशच नाही, तर संपूर्ण जग लवकर बाहेर पडावे, अशी प्रार्थना त्यांनी केली. जोपर्यंत रिक्षा आहे तोपर्यंत मोफत रुग्णसेवा अशीच सुरू ठेवणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Teachers are driving rickshaws to provide ambulance service, online education, free ambulance service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.