Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 10:07 IST2025-07-10T10:06:08+5:302025-07-10T10:07:28+5:30
१६ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षकाला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली

Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
१६ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षकाला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली असून तिने जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आरोपी शिक्षिकेवर संबंधित विद्यार्थ्याला पंचतारांकित हॉटेल्समध्ये नेऊन अनेकदा त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. गुरू- शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने पालकवर्गामध्ये चिंता निर्माण झाली आहे.
पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये शाळेच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले. जानेवारी महिन्यात पहिल्यांदा शिक्षिकेने मुलासोबत लैंगिक संबंध ठेवला. त्यानंतर तिने अनेकदा मुलाला पंचतारांकित हॉटेल्समध्ये घेऊन गेली आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. लैंगिक संबंध ठेवण्याआधी शिक्षिका मुलाला दारू प्यायला भाग पाडायची. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाने मुंबईतील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, तरीही शिक्षिका त्याच्या संपर्कात होती.
मुलाच्या वागण्यात अचानक बदल दिसून आल्यानंतर पालकांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर मुलाने संपूर्ण प्रकार पालकांच्या कानावर घातला. सुरुवातीला पालकांनी मुलाची समजूत काढली. शिक्षिकेने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.
महिलेवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या कलम ४, ६ आणि १७ तसेच भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षिका अजूनही न्यायालयीन कोठडीत असून तिने जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.