'हिंदू दहशतवाद' शब्दावरुन सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी - विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 17:26 IST2019-04-17T17:25:25+5:302019-04-17T17:26:39+5:30
राजकारणात निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे

'हिंदू दहशतवाद' शब्दावरुन सुशीलकुमार शिंदेंनी जनतेची माफी मागावी - विनोद तावडे
मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारांशी सहानभूती मिळविण्यासाठी आपली ही शेवटची निवडणुक असल्याचे आवाहन केलं होतं. मात्र राजकारणात निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे. तसेच सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, कॉंग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज मांडत आहेत ते आतापर्यंत तुम्ही का सोडवू शकला नाहीत असा सवालही विनोद तावडे यांनी केला आहे. तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
विनोद तावडे म्हणाले की, कॉंग्रेसचे दुसरे नेते अशोक चव्हाण सुध्दा सहानुभूती गोळा करीत आहेत. आता मला वाचावा असे ते मतदारांना सांगत आहेत, पण चव्हाण वर्षोनुवर्षे राजकारणात असूनही त्यांनी जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे केवळ सहानभूती दाखवून जनतेची मते मिळत नाही, जर जनतेची कामे केली तर जनता तुमच्या पाठीशी उभे राहते असा टोला तावडेंनी अशोक चव्हाणांना लगावला.
शरद पवारांना दिलं भाजपाने आव्हान
मुख्यमंत्र्यांच्या जवळची माणसे मराठा आरक्षणच्या विषयात वकीलपत्र घेत आहेत असं विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेताना तावडे म्हणाले की, राज्य सरकारने अँटर्नी जनरल अँड. अणे यांची सरकारने नियुक्ती केली होती, पण नंतर त्यांनी पद सोडले व भाजपच्या विरोधात प्रचार केला. तसेच मुख्यमंत्र्याच्या विरोधातही त्यांनी प्रचार केला.
न्या. लोया प्रकरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्याच जयश्री पाटील या मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकार्त्या आहेत, अशी माहिती आहे. अँड. गुणरतन सदावर्ते हे पाटील यांचे वकील आहेत. मग अमित शहा यांच्या विरोधात याचिका करणारे आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे एकच असतील तर याचा बोलिवता धनी कोण हे आपण जनतेला सांगावे असे आवाहन विनोद तावडे यांनी शरद पवार यांना केले