पुतण्याच्या मदतीला काका धावले; सुशांत राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच मनसेकडून प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 08:05 PM2020-08-13T20:05:58+5:302020-08-13T20:19:42+5:30

या संपूर्ण प्रकरणानंतर मनसेने आदित्य ठाकरेंची पाठराखण करत यावर भाष्य केले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला

Sushant Singh Rajput: Reaction from MNS Bala Nandgoankar over Aaditya Thackeray name & CBI probe | पुतण्याच्या मदतीला काका धावले; सुशांत राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच मनसेकडून प्रतिक्रिया

पुतण्याच्या मदतीला काका धावले; सुशांत राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच मनसेकडून प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देमैत्री सगळ्यांशी सगळ्यासोबत असते, त्यात गैर नाहीठाकरे कुटुंबातील कुणी असं करेल वाटत नाहीमनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आदित्यची पाठराखण

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव गोवल्यानंतर पहिल्यांदाच यावर मनसेकडून भाष्य करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरु आहे. स्वत: आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणाशी माझा संबंध नाही असा खुलासा केला होता. तर सुशांत आणि त्याच्या वडिलांचे चांगले संबंध नव्हते, सुशांतच्या वडिलांनी दुसरं लग्न केले होते असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लावला होता.

या संपूर्ण प्रकरणानंतर मनसेने आदित्य ठाकरेंची पाठराखण करत यावर भाष्य केले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मैत्री सगळ्यांशी सगळ्यासोबत असते, अनेकांनी सीबीआयची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सीबीआयकडे केस वर्ग केली आहे. जे काही असेल ते चौकशीतून बाहेर येईल पण ठाकरे कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा यात सहभाग असेल असं मला वाटत नाही असं सांगत मनसेने आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

या प्रकरणात आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

राज्य सरकार कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करत आहे, बहुदा महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे असा आरोप त्यांनी केला होता. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

यापूर्वी राज ठाकरेंनी सुशांत प्रकरणावर काय भूमिका घेतली होती?

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपसृष्टीत वाद उसळला होता आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला गेला. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा, अशा आशयाच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर याबाबत खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी अशा शब्दात स्पष्टीकरण दिलं होतं.

काय आहे सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण?

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून रोजी आपले जीवन संपवले. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांत सिंग राजपूतने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे म्हटलं जातं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आरोप केले होते. या प्रकरणात चाहत्यांनी करण जोहर आणि सलमान खान यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. कालांतराने या प्रकरणात रिया चक्रवर्तीचं नाव जोडलं गेले. रिया ही सुशांतची गर्लफ्रेंड होती. तिने सुशांतची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सुशांतच्या वडिलांनी पटणा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली. सुशांतची मेनेजर दिशा सालियाने हिनेही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर दिशावर बलात्कार करुन तिची हत्या केली असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी लावला होता. या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले गेले. मुंबई पोलीस या आरोपातून कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप विरोधकांनी करुन याचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली. सध्या मुंबई पोलीस आणि सीबीआय यांच्यातील चौकशीचा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

Web Title: Sushant Singh Rajput: Reaction from MNS Bala Nandgoankar over Aaditya Thackeray name & CBI probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.