एसटी कर्मचाऱ्यांचे ११ला आंदोलन

By Admin | Updated: February 5, 2015 23:01 IST2015-02-05T23:01:09+5:302015-02-05T23:01:09+5:30

प्रवासी वाहतूक व्यवस्था निर्माण होणार असल्याने त्याविरोधात इंटकने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरविले आहे.

ST workers' 11th movement | एसटी कर्मचाऱ्यांचे ११ला आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांचे ११ला आंदोलन

ठाणे : एसटी महामंडळाविरोधात प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड सेफ्टी बिल २०१४ मधील तरतुदीनुसार खाजगी वाहनास टप्पा वाहतुकीला परवानगी देणे व एसटी महामंडळाला जाचक असलेल्या इतर अटी व शर्तीमुळे तसेच प्रस्तावित विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर राज्य, महापालिका आणि तालुका पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रवासी वाहतूक व्यवस्था निर्माण होणार असल्याने त्याविरोधात इंटकने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
यातील टेंडर पध्दतीमुळे एसटी महामंडळाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार असून त्याचा फटका कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे आता येत्या ११ फेब्रुवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) ने घेतला आहे. इंटकच्या १ फेब्रुवारीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी मधील कर्मचाऱ्यांचे पगार शासकीय - निमशासकीय व इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहेत. याला जबाबदार मान्यताप्राप्त संघटना असून या संघटनांच्या नाकर्तेपणामुळे व स्वार्थी भूमिकेमुळे कामगारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या विरोधात औद्योगिक कलह अधिनियम १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार मोडीत काढण्यात यावा आणि एम.एस.ई.बी. प्रमाणे २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून पगारवाढ झाल्याशिवाय इंटक शांत बसणार नसल्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. तसेच येत्या ११ फेब्रुवारी रोजी पुकारण्यात येणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ST workers' 11th movement