दक्षिण मध्य मुंबई: दादर, धारावीच्या लढ्यात नायगावची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 04:58 AM2019-04-27T04:58:29+5:302019-04-27T04:59:28+5:30

बालेकिल्ल्यात सेनेला मनसेची धास्ती; माजी मंत्री वर्षा गायकवाडांची प्रतिष्ठा पणाला

South Central Mumbai: Nayagaon entry in the battle of Dadar, Dharavi | दक्षिण मध्य मुंबई: दादर, धारावीच्या लढ्यात नायगावची एन्ट्री

दक्षिण मध्य मुंबई: दादर, धारावीच्या लढ्यात नायगावची एन्ट्री

Next

-गौरीशंकर घाळे

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात हातघाईची लढाई आहे. प्रचाराची बदललेली भाषा, कोट्या, आरोप- प्रत्यारोप, नेत्यांचे रुसवेफुगवे ही सारी त्याचीच लक्षणे. दादरने साथ दिली तर शिवसेना आणि धारावीने साथ दिली तर काँग्रेस, असा आजवरचा शिरस्ता बदलण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहे.

काँग्रेसची धारावीतील रसद तोडण्यासाठी शिवसेनेने ताकद लावली आहे. धारावीतील डास मलाही चावतो, त्यामुळे आपण डासबंधू असल्याचे नवे नाते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेत धारावीवासीयांना उलगडून सांगितले. आमचा राहुल धारावीतच जन्मला. मग उपरे कशाला हवेत, असा सवालही त्यांनी केला. शेवाळेंनी ‘गली बॉइज्’ना मैदानात उतरवत धारावीच्या गल्लीबोळात ‘रॅप गाणी’ वाजतील, याची व्यवस्था केली. तिकडे, एकनाथ गायकवाडांसाठी पथनाट्ये सुरू आहेत. भाषणांपेक्षा मतदारांची जुळवाजुळव महत्त्वाची असल्याची काँग्रेसला जाणीव आहे. हे काम आ. वर्षा गायकवाडांकडे आहे. वडिलांकडून राजकीय वारसा घेत त्यांनी आमदार, मंत्री असा प्रवास केला. आता ७९ वर्षांच्या एकनाथ गायकवाड यांच्या जयपराजयापेक्षा आपली राजकीय कसोटी असल्याच्या जाणीवेने त्या कामाला लागल्या.

दादर, माहीम पट्ट्यातील काँग्रेस तशी कायमच खंगलेली, पण अंतर्गत लाथाळ्यात इथले काँग्रेसजन वस्ताद. विधानसभेची भीती, लालुच दाखवत पक्षश्रेष्ठींनी कशीबशी ही आघाडी सांभाळली. शिवाजी पार्कातील मॉर्निंग वॉकच्या प्रचारात मनसेवाले आल्याने काँग्रेसजनांना झालेला आनंद अल्प ठरला. खासदारकीची दहा आणि त्यानंतरची पाच वर्षे दादरकरांसाठी गायकवाड ‘आउट आॅफ कव्हरेज’ होते. तरीही त्यांच्यासाठी इंजिन धावतंय हे काही स्थानिकांच्या पचनी पडत नसल्याचे लक्षात येताच जाहीरपणे नको, पडद्यामागे काय ते बघू, अशी भूमिका घेत मनसेसैनिकांनी आवरते घेतले. तर, बालेकिल्ल्यातील दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेने आपले नेटवर्क तयार ठेवले आहे. त्यातच माजी शिवसैनिक आणि आता भाजपोत्सुक असलेले नायगावचे कालिदास कोळंबकरही राहुल शेवाळेंसाठी प्रचारात उतरल्याने काँग्रेसवाल्यांनी त्यांचा उद्धार सुरू केला आहे. त्यांच्यावरून शिवसेनेतही नाराजीनाट्य रंगले आहे.

पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर आत्मविश्वासाने जनतेसमोर जातोय. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे दक्षिण-मध्य मुंबईवर महायुतीचा भगवा दिमाखात फडकणार, याची खात्री आहे !
- राहुल शेवाळे,
उमेदवार शिवसेना

२०१४पासून अल्पसंख्याक व दुर्बल घटकांवरील हल्ले वाढले आहेत. यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. ही बाब पीडित समाज विसरलेले नाहीत. धर्मांध शक्तींना हद्दपार करण्यासाठी लोक आमच्या पाठिशी उभे राहतील.
- एकनाथ गायकवाड,
उमेदवार काँग्रेस

कळीचे मुद्दे
धारावी पुनर्विकास, बीडीडी चाळींची पुनर्बांधणी, माहुलचे प्रदूषण, वाहतूककोंडी, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, संविधान आदी.
वंचित, बसपासह छोटे पक्ष, अपक्षांचे समीकरण जुळविणे मोठे आव्हान असणार आहे.

Web Title: South Central Mumbai: Nayagaon entry in the battle of Dadar, Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.