Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचा महापौर बसेल, संजय राऊतांचा दावा; काँग्रेसची मदत घेणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:30 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यास काहीच अडचण नव्हती तरी बॅलेटवर निवडणूक घेतली नाही.

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या निकालाचे कल आता समोर येत आहेत. त्याआधीच उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. मुंबई वाचवण्यासाठी आणि भाजपाला रोखण्यासाठी जे जे सोबत येतील त्या सगळ्या पक्षांची मदत घेतली जाईल. गरज भासल्यास काँग्रेसचीही मदत घेऊ असं राऊतांनी स्पष्ट केले आहे.

निकालाआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, लोकांनी केलेले मतदान जर ईव्हीएम मशीनमधून गायब केले नसेल तर ठाकरे बंधूंचा महापौर होईल. लोकांनी आम्हाला मोठ्या संख्येने मतदान केले आहे. भाजपाकडे पूर्ण यंत्रणा आहे म्हणून ते खात्रीने सांगतायेत १४० जिंकतोय, २०० जिंकतो..आमचा आकडा फार सौम्य होता की बहुमत आम्हाला मिळेल. गरज भासल्यास काँग्रेसची मदत नक्की घेऊ. मुंबई वाचवण्यासाठी आणि भाजपाला रोखण्यासाठी जे जे सोबत येतील त्या सगळ्यांची मदत घेतली जाईल. मदत घेण्यापेक्षा हे पक्ष स्वत: समोर येतील. मराठी माणसे, मुंबईकरांनी शिवसेना-मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान केले आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच काल ६ वाजता भाजपाचे प्रमुख लोक आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेजही आहेत. मतदारांमध्ये गोंधळ होता. अनेकांना मतदान करता आले नाही. या तक्रारी घेऊन लोक महापालिका आयुक्तांना भेटायला आले होते. महापालिकेत आयुक्त कार्यालयात नाही असं सांगण्यात आले. परंतु ते दुसऱ्या एका खोलीत बसून भाजपा नेत्यांसोबत बैठक घेत होते. आता हे समोर आले आहे. राजकीय पक्षासोबत तुमचा काय अजेंडा ठरलाय? असा प्रश्नही संजय राऊतांनी विचारला आहे. 

दरम्यान, ईव्हीएम मशीन बंद पडणे, तुतारीचं बटण दाबल्यावर कमळाला मत जाणे, मशालीचं बटणच दाबले जात नाही या तक्रारी आत्ताच्या आहेत का तर नाही. आम्ही म्हणतो बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. तुम्हाला निष्पक्ष निवडणूक हवी असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यास काहीच अडचण नव्हती तरी बॅलेटवर निवडणूक घेतली नाही. तरीही आम्ही एका जिद्दीने मतदाराला सामोरे गेलो. शिवसेना-मनसे आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्रित प्रचार केला. आता काय निकाल येतो त्याची आम्ही प्रतिक्षा करत आहोत. जरी सत्ताधारी लोकशाही मानत नसले तरी आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray brothers' mayor in Mumbai, claims Raut; will Congress help?

Web Summary : Sanjay Raut claims a Thackeray brother could be Mumbai's mayor, suggesting possible alliance with Congress to stop BJP. He alleged BJP collusion with the election commission and criticized EVM malfunctions, advocating for ballot elections. Raut highlighted a meeting between BJP leaders and the Municipal Commissioner, questioning its agenda.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६संजय राऊतमनसेउद्धव ठाकरेभाजपाकाँग्रेस