पोलीस आणि इराणींमध्ये धुमश्चक्री

By Admin | Updated: June 14, 2015 23:09 IST2015-06-14T23:09:39+5:302015-06-14T23:09:39+5:30

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या ठाण्याच्या कापूरबावडी पोलिसांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागला

Smoke in Police and Irani | पोलीस आणि इराणींमध्ये धुमश्चक्री

पोलीस आणि इराणींमध्ये धुमश्चक्री

कल्याण : सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या ठाण्याच्या कापूरबावडी पोलिसांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. इराणींच्या ३० ते ४० जणांच्या जमावाने हातात लाठ्याकाठ्या घेऊन दगडफेक केल्याने पोलिसांच्या ताब्यातील संशयित महिला आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची घटना शनिवारी आंबिवली-मोहने परिसरात घडली. या दगडफेकीत सात पोलीस किरकोळ जखमी झाले असून यात एका महिला पोलिसाचा समावेश आहे.
कापूरबावडी पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील दोघा अट्टल चोरट्यांना काही दिवसांपूर्वी अटक केली. चौकशीदरम्यान त्या दोघांनी चोरीचे दागिने विकण्याकरिता अरियन बुलडोझर आणि जेनब इराणी यांच्याकडे दिल्याची कबुली दिली. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार या दोघी मोहना चौकीजवळील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिमंडळ-५ च्या विशेष पथकाने या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मोहना परिसरात सापळा लावला. जेनब ही रिक्षातून खाली उतरत असताना तिच्याभोवती गराडा घालून तिला ताब्यात घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला. मात्र, याच वेळी ३० ते ४० जणांच्या जमावाने पोलिसांच्या दिशेने लाठ्याकाठ्या आणि दगडांनी हल्ला चढविला. जमावापुढे तुटपुंज्या पोलिसांची ताकद कमी पडल्याने जेनब पळून जाण्यात यशस्वी ठरली. पथकातील पोलीस उपनिरीक्षक निशा चौधरी यांनी याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी ४० जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: Smoke in Police and Irani