संजय राऊतांनी केले माधवी जाधवांचे कौतुक; म्हणाले, “बाबासाहेबांचा अपमान झाला, मंत्र्यांनी…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:56 IST2026-01-27T13:55:10+5:302026-01-27T13:56:21+5:30
Sanjay Raut News: प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यावरून विरोधक भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत आहेत.

संजय राऊतांनी केले माधवी जाधवांचे कौतुक; म्हणाले, “बाबासाहेबांचा अपमान झाला, मंत्र्यांनी…”
Sanjay Raut News: देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अशातच नाशिकमध्ये मात्र खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले. पंरतु, आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यावरून वन विभागातील माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने थेट जाब विचारला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले. विरोधकांनी या घटनेनंतर भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करताना वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांचे कौतुक केले आहे.
बाबासाहेबांसाठी सरकारी नोकरी पणाला, मंत्री गिरीश महाजनांना आव्हान देणाऱ्या माधवी जाधव कोण?
गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे, तो भरून निघण्यासारखा नाही. कुंभमेळ्यात नदीत आंघोळ केली, तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही. संविधानाच्या मार्गानेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल, तेव्हाच ते पाप धुतले जाईल. गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटी दाखल करावी. अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण सुरू करणार आहे, असा थेट इशारा माधवी जाधव यांनी दिला आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचे कौतुक करतो
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. २६ जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळाले. भारत प्रजासत्ताक झाला, अशा वेळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे हे सत्य आहे. तसेच त्या महिलेचा सन्मान व्हायला हवा. त्यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचे कौतुक करतो. पण, आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेले आहे. आता फार विषय ताणू नये, असे संजय राऊतांनी सांगितले.
“बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल
दरम्यान, मी दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब यांचे विचार जपणारा आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मला माहिती नाही की, त्या भगिनी कोण आहेत? मला खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी पुढाकार घेतो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला. आता अनवधानाने राहिले असेल पण एवढे कशासाठी? मी चाळीस वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असे कधी झाले का? ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? अशी विचारणा गिरीश महाजन यांनी केली.