शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:49 IST2025-12-24T16:45:12+5:302025-12-24T16:49:22+5:30
MNS Leader Bala Nandgaonkar News: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आग्रही आणि प्रयत्नशील असलेले बाळा नांदगावकर या ऐतिहासिक दिवशी कुठेच दिसले नाहीत.

शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
MNS Leader Bala Nandgaonkar News: गेल्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्रातील जनता ज्या क्षणाची आतुरतेने प्रतिक्षा करत होती, ती शिवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंची बाजू आक्रमकपणे मांडणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मंचावर मानाचे स्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. परंतु, ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आग्रही आणि प्रयत्नशील असलेले बाळा नांदगावकर मात्र या ऐतिहासिक दिवशी कुठेच दिसले नाहीत. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता ज्याची प्रतिक्षा करत होती, ती शिवसेना-मनसे युतीची घोषणा आम्ही जाहीर करत आहोत. कोण किती जागा लढवणार याचे आकडे आम्ही सांगणार नाही. परंतु, जे उमेदवार असतील त्यांना कळवले जाईल, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा केली. या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मध्यभागी घेऊन फोटोही काढले. या सगळ्या घडामोडीत राज ठाकरेंचे शिलेदार बाळा नांदगावकर कुठेही दिसले नाहीत.
ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बाळा नांदगावकरांचे प्रयत्न
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. सातत्याने दोन्ही बंधूंनी एकत्र येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विविध माध्यमांना मुलाखती देतानाही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले होते. लीलावती रुग्णालयात बाळासाहेबांना शब्द दिला होता की, शेवटपर्यंत दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन. त्यामागे माझा कुठलाही स्वार्थ नाही. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी दोन्ही भावांनी एकत्र आले पाहिजे, त्या दिवशी माझे राजकारण संपले तरी चालेल, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. मराठी भाषेच्या मुद्द्यावर अनेक वर्षांनी जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तेव्हाही बाळा नांदगावकर यांनी समाधान व्यक्त केले होते. त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या होत्या.
राज ठाकरेंचे शिलेदार बाळा नांदगावकर नेमके आहेत तरी कुठे?
यानंतर जेव्हा-जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू भेटले, तेव्हा-तेव्हा बाळा नांदगावकर यांनी आनंद व्यक्त केला. परंतु, ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली, त्या महत्त्वाच्या क्षणी मात्र बाळा नांदगावकरांची अनुपस्थिती सर्वांनाच दिसून आली. बाळा नांदगावकर यांची प्रकृती बरी नाही. कालपासून आजारी असल्यामुळे बाळा नांदगावकर युतीच्या घोषणेवेळी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, अशी माहिती देण्यात आली आहे. ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी तसेच दोन्ही पक्षांच्या युतीसाठी संजय राऊतांनी प्रयत्न केले, तसेच बाळा नांदगावकर हेही या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग होते. राज आणि उद्धव यांना एकत्र आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार, असा शब्द बाळा नांदगावकरांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव महत्त्वाच्या क्षणी बाळा नांदगावकर उपस्थित राहू शकले नाहीत.