‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 07:48 AM2020-03-21T07:48:20+5:302020-03-21T07:51:32+5:30

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारला शंभर दिवस झाले. हे सरकार उद्या पडेलच. फार तर ‘अकरा’ दिवस चालेल असे वायदे करणारे आज चेहरे लपवून फिरत आहेत

Shiv Sena Target BJP Leaders who criticize CM Uddhav Thackeray on Coronavirus Issue pnm | ‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

googlenewsNext
ठळक मुद्देफडणवीस सरकारने या आरोग्य आणीबाणीचा एखादा राजकीय इव्हेंट केला असता, दुसरे काय केले असते?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत ते महाराष्ट्र विषाणूमुक्त करण्यासाठी. सामना अग्रलेखातून शिवसेनेने घेतला भाजपा नेत्यांचा समाचार

मुंबई - फडणवीस यांना राज्य चालविण्याचा अनुभव आहे व उद्धव ठाकरे यांना आहे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. भाजपातील उपर्यांना हा अधिकार कोणी दिला? महाविकास आघाडी सरकारात कुरबुरी नाहीत. फाटाफुटीचा कोरोना व्हायरस येथे कधीच मेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत ते महाराष्ट्र विषाणूमुक्त करण्यासाठी. फडणवीस यांनी वेगळे काय केले असते? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने विचारला आहे.  

तसेच कोरोना विषाणू गिळून त्यांनी ढेकर दिली असती की त्या विषाणूच्या मागे सीबीआय, ईडी वगैरे लावून या व्हायरसची बोलती बंद केली असती? महाराष्ट्रात सीबीआय, ईडी वगैरेतून निर्माण झालेला सूडाचा विषाणू ठाकरे सरकारने मारला तसा कोरोना विषाणू मारला जाईल. तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा ‘मास्क’ तोंडात बोळा म्हणून वापरावा अशा शब्दात भाजपा नेत्यांचा समाचार घेण्यात आला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे  

  • ‘हवस के शिकार’ असा एक ‘ड’ दर्जाचा चित्रपट चाळिसेक वर्षांपूर्वी येऊन गेला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात जो विकार बळावू पाहत आहे तो म्हणजे राजकीय ‘हवस के शिकार’ म्हणावा त्यातलाच प्रकार आहे.
  • संपूर्ण देश, आपला महाराष्ट्र कोरोना व्हायरसशी एक युद्ध म्हणून लढत आहे. जनतेच्या जिवाशी खेळणार्या विषाणूशी इतका मोठा लढा महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मंत्रिमंडळ मोठी झुंज देत असताना भाजपातील काही उपर्या ‘अक्कलवंतां’नी टीकेची निरांजने ओवाळली आहेत.
  • उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव शून्य असल्याने आता महाराष्ट्राला म्हणे पुन्हा अनुभवसंपन्न देवेंद्र फडणवीसांची गरज आहे. हे सर्व कोण सांगते आहे? तर ज्यांनी सारी हयात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पखाल्या वाहिल्या व नंतर ‘हवा’पाणी बघून भाजपात उड्या मारल्या ते. असे बेडूक जर फडणवीस यांच्यासाठी ही ‘कोरोना मोहीम’ राबवीत असतील तर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर काय ही वेळ आली, काय हे त्यांचे अधःपतन झाले असेच विचारावे लागेल.
  • भाडोत्री भगतगणांचे ‘क्वारंटाईन’ फडणवीस यांनी केले नाही तर त्यांची उरलीसुरली पतही लयास जाईल. महाराष्ट्रावर संकट आहे. हे संकट काही राजकारण्यांनी निर्माण केलेले नाही. सारे जगच या संकटामुळे मरून आणि गळून पडले आहे. पुन्हा महाराष्ट्रात आलेले हे संकट ‘आयात’ आहे. त्याचा संसर्ग वाढू नये यासाठीच लढा द्यावा लागेल व तो ताकदीने दिला जात आहे.
  • लोकांचा त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे व सरकारच्या पाठीशी जनता उभी आहे. आता त्याची पोटदुखी विरोधी पक्षाला सुरू झाली असेल तर भाजपचे भाडोत्री बगलबच्चे मानवतेचे शत्रू आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची, राजकीय कुरघोड्या करण्याची नसून एकमेकांना सहकार्य करून ‘कोरोना’ नावाच्या महामारीपासून महाराष्ट्राला व देशाला वाचवण्याची आहे.
  • पंतप्रधानांनीसुद्धा देशाला एक आवाहन केले आहे. त्यांचेही स्वागतच आहे. कोरोनाशी लढण्यात मोदी यांचा अनुभव कमी, त्यामुळे पुन्हा अनुभवी डॉ. मनमोहन सिंग यांनाच आणा असे कोणी म्हटले तर काय होईल? कोरोनाचे सोडा, देशाची अर्थव्यवस्था सध्या साफ कोसळली आहे. मग ती सावरण्यासाठी निष्णांत अर्थतज्ञ असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांची देशाला गरज आहे असे कोणाला वाटले तर?
  • ‘‘आता फडणवीस हवे होते,’’ असा प्रचार करणे म्हणजे मढ्यावरचे लोणी खाणेच आहे. फडणवीस यांना राज्य चालविण्याचा अनुभव आहे व उद्धव ठाकरे यांना आहे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. भाजपातील उपर्यांना हा अधिकार कोणी दिला? फडणवीस यांचा अनुभव काय व कसा कामी आला ते कोरेगाव-भीमा दंगलीत संपूर्ण देशाने पाहिले. संपूर्ण महाराष्ट्र दंगलीत जळत होता तेव्हा ‘अनुभव’ हात-पाय गाळून बसला होता.
  • सांगलीच्या महापुरातही त्या फसलेल्या नाटकी अनुभवाचे दर्शन झालेच. महाराष्ट्र गेल्या पाच वर्षांत पन्नास वर्षं मागे गेला आणि भगतगणांचे मात्र टाळ-चिपळ्यांचे भजन सुरू होते. नोटाबंदीसारख्या निर्णयाने औद्योगिक महाराष्ट्राची पीछेहाट झाली व अनुभवसिद्ध फडणवीस नोटाबंदीच्या समर्थनार्थ सनईचौघडे वाजवीत बसले. परिणामी महाराष्ट्रात लाखो लोक बेरोजगार झाले.
  • सत्तेच्या जोरावर त्यांनी विरोधकांची माणसे फोडली. ती फुटकी माणसेही विधानसभा निवडणुकीत पराभूत झाली. शिवसेनेस दिलेला शब्द या मंडळींनी पाळला नाही. शेवटपर्यंत या बोटावरची थुंकी त्या बोटावर करीत राहिले व परिणामी ‘अनुभवी’ मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे राज्य गमावले. खोटे बोलण्याचा व रेटून नेण्याचा अनुभव त्यांना होता हे खरे, पण महाराष्ट्रात खोटेपणा चालला नाही.
  • मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारला शंभर दिवस झाले. हे सरकार उद्या पडेलच. फार तर ‘अकरा’ दिवस चालेल असे वायदे करणारे आज चेहरे लपवून फिरत आहेत. मोदी व शहांसारखे भक्कम अनुभवी नेतृत्व असतानासुद्धा सीएए कायद्यावरून देशाची राजधानी पेटली. शंभर माणसे मेली. इतर राज्यांतही बखेडा झाला, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुत्सद्दीपणामुळे मुंबई-महाराष्ट्र शांत राहिला.
  • महाविकास आघाडी सरकारात कुरबुरी नाहीत व राज्यात आदळआपट नाही. सर्व कसे ठीक सुरू आहे. फाटाफुटीचा कोरोना व्हायरस येथे कधीच मेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत ते महाराष्ट्र विषाणूमुक्त करण्यासाठी. फडणवीस यांनी वेगळे काय केले असते? फडणवीस सरकारने या आरोग्य आणीबाणीचा एखादा राजकीय इव्हेंट केला असता, दुसरे काय केले असते?

Web Title: Shiv Sena Target BJP Leaders who criticize CM Uddhav Thackeray on Coronavirus Issue pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.