शिवसेनेने आम्हाला सल्ले देऊ नयेत; ‘संपुआ’च्या नेतृत्वावरून काँग्रेसने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:23 AM2020-12-28T01:23:09+5:302020-12-28T07:02:23+5:30

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडे संपुआचे नेतृत्व देण्याबाबत विधान केले होते.

Shiv Sena should not give us advice | शिवसेनेने आम्हाला सल्ले देऊ नयेत; ‘संपुआ’च्या नेतृत्वावरून काँग्रेसने सुनावले

शिवसेनेने आम्हाला सल्ले देऊ नयेत; ‘संपुआ’च्या नेतृत्वावरून काँग्रेसने सुनावले

googlenewsNext

मुंबई : शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीत (संपुआ) नाही. त्यामुळे संपुआच्या नेतृत्वाबाबत सल्ले देऊ नये. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर शिवसेनेसोबत आघाडी झाली असून ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. त्यामुळे संपुआच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेना नेत्यांनी वक्तव्ये करू नयेत, असा इशारा काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडे संपुआचे नेतृत्व देण्याबाबत विधान केले होते. तर, शुक्रवारी पक्षाच्या मुखपत्रात काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘ओसाड गावची पाटीलकी’ अशी संभावना केली होती. शिवाय, देशात विरोधी पक्ष मरतुकड्या अवस्थेत आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार एककल्ली कारभार रेटत आहे. विरोधी पक्षालाही एक सर्वमान्य नेतृत्व असावे लागते. त्याबाबत देशातील विरोधी पक्ष संपूर्ण दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभा आहे.

संपुआची अवस्था एनजीओसारखी झाली आहे, असे सांगत शरद पवार यांचे गुणगान केले. शिवाय, देशातील सर्व पक्षांनी एकत्रितपणे आघाडी उघडण्याचे आवाहन केले. संपुआचे नेतृत्व आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात शिवसेना नेते राऊत यांनी केलेल्या विधानावरून  काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत, चव्हाण म्हणाले की, शिवसेना अद्याप संपुआमध्ये सहभागी झालेली नाही. जो पक्ष अद्याप संपुआचा घटक पक्षही झालेला नाही, त्यांनी अशा प्रकारे नेतृत्वाबाबत विधाने करणे संयुक्तिक नाही. शिवाय, संपुआच्या नेतृत्वाच्या चर्चांना शरद पवार यांनीच नाकारले आहे. घटक पक्षांनीही सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे अशी विधाने करू नयेत, असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेसविरोधी अभियान वेळीच थांबवा - संजय निरुपम

संजय निरुपम यांनीही शिवसेनेने काँग्रेसच्या अंतर्गत बाबींत ढवळाढवळ करू नये, असे म्हटले आहे. राज्यातील जनतेला कसा दिलासा देता येईल, याकडे शिवसेनेने लक्ष द्यावे. काँग्रेसविरोधी अभियान पुढे रेटण्याचा शिवसेनेचा हा प्रकार आगीशी खेळ ठरेल. या आगीत शिवसेना भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसविरोधी अभियान आणि राहुल गांधींवर टीका करण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, असा इशाराही निरुपम यांनी दिला.

Web Title: Shiv Sena should not give us advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.