Join us  

'...इसलिये लोग अक्सर मेरे खिलाफ होते है'; संजय राऊतांचं पुन्हा एकदा ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 9:58 AM

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शायरीच्या माध्यमातून ट्विट करत आपलं मत व्यक्त केले आहे.

मुंबई: राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भूमिका महत्वाची ठरली. त्याचप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करण्यासोबतच विरोधकांवर देखील निशाणा साधत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा ट्विट करत आपल्या भूमिकेच्या विरुद्ध बोलणाऱ्यांवर टीका केली आहे.

संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, इरादे हमेशा मेरे साफ होते हैं, इसलिये लोग अक्सर मेरे खिलाफ होते है म्हणत पुन्हा एकदा शायरीच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केलं आहे.

याआधी देखील संजय राऊत यांनी निवडणूक निकालानंतर शेरो-शायरीतून भाजपावर टीकास्त्र सोडले होते. त्याचप्रमाणे भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे भाजपा व शिवसेनेच्या युतीमध्ये फूट पडली असल्याचे आरोप करण्यात येत होते. भाजपाच्या या आरोपांवर दोस्तों में मशहूर हुए तो क्या मज़ा, मज़ा तो तब है जब चर्चा दुश्मनों की महफ़िल में हो असं म्हणत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते. 

नागपूरात सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनेच्या रणनितीबाबत महाविकासआघाडीची आज बैठक होणार आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते व आमदार उपस्थित राहणार असून या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रेप इन इंडिया या विधानावरुन राहुल यांनी माफी मागावी, अशी भूमिका भाजपानं घेतली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यावेळी त्यांनी थेट सावरकरांचा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन ट्विट करुन राहुल गांधींना सूचक इशारा दिला होता. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,' असं संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं होतं. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपानागपूर हिवाळी अधिवेशनमहाराष्ट्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसउद्धव ठाकरे