'चायपेक्षा किटली गरम'; रश्मी ठाकरेंना पत्र लिहणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर राऊतांचा निशाणा

By मुकेश चव्हाण | Published: January 4, 2021 08:03 AM2021-01-04T08:03:15+5:302021-01-04T08:09:17+5:30

चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Shiv Sena leader Sanjay Raut has again criticized BJP leader Chandrakant Patil | 'चायपेक्षा किटली गरम'; रश्मी ठाकरेंना पत्र लिहणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर राऊतांचा निशाणा

'चायपेक्षा किटली गरम'; रश्मी ठाकरेंना पत्र लिहणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर राऊतांचा निशाणा

googlenewsNext

मुंबई: भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी सामनाच्या संपादकीयमधून निशाणा साधण्यात आला होता. त्यावरुन, चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे ‘सामना’मधील भाषा आपणास योग्य वाटते का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. यानंतर आता पुन्हा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरु केली आहे. प. बंगालातील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करुया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठे काम चंद्रकांत पाटलांना करावे लागणार आहे. चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे! दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला असल्याचे सांगत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 

राज्यातील विरोध पक्षाला त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बहकलेला विरोधी पक्ष हा महाराष्ट्रातील चिंतनाचा विषय ठरला आहे, पण चिंतन करायचे कोणी? भारतीय जनता पार्टीच्या चिंतन व मंथन बैठका अधूनमधून होत असतात. पण एक महाचिंतन बैठक घेऊन सध्याच्या विरोधी पक्षआने विधायक कार्यात कसे गुंतवून घ्यावे, याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. पण ‘चायपेक्षा किटली गरम’ असे काही लोकांचे सुरू आहे. उठसूट फक्त विरोध, दुसरे काही नाही. ‘‘मुंबईतील महाकाली गुंफा विकू देणार नाही, एक इंचही जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही’’, अशा विरोधी वक्तव्याच्या उकळ्या काही किटल्यांना फुटल्या आहेत. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी ‘बिल्डर’च आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. 

राज्य सरकारने कोणताही निर्णय घ्यायचा म्हटले की, ‘ब्लॅकमेल’ करणारी किरकिराटी मांजरे आडवी घालायची, हे जणू धोरणच झाले आहे. पंतप्रधान मोदी हे दूरदृष्टीने विचार करणारे नेते असल्याचे एक विधान श्री. प्रकाश जावडेकर यांनी केले आहे, ते बरोबर आहे. मग ज्या पक्षाचा नेता असा दूरदृष्टीचा आहे, त्या पक्षाचे पदाधिकारी इतक्या अधू दृष्टीचे का बरे? हासुद्धा चिंतनाचाच विषय आहे. म्हणे एक इंचही जागा विकू देणार नाही! तिकडे लडाखच्या हद्दीत चीनचे सैन्य घुसून त्यांनी ‘इंच’भर नाही, तर मैलोन्मैल हिंदुस्थानी जमीन कब्जात घेतली आहे. त्यावर या किटल्या का तापत नाहीत, हा प्रश्नच आहे. लडाखची जमीन अगदी इंच इंच पद्धतीने चिन्यांच्या घशात गेली तर चालेल का, तेवढे जरा सांगा. भारतीय जनता पक्षाचे हे ढोंग आहे व या ढोंगाचा बुरखा चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मशहूर पत्रलेखकांनी आता फाडायलाच हवा. चंद्रकांत पाटील हे हल्ली वाचकांची पत्रे, तक्रारी सूचना वगैरे सदरांखाली पत्र लिहून अनेक विषयांना वाचा फोडतात, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. 

महाराष्ट्राचे सरकार बिल्डरांच्या पायावर लोटांगणे घालत असल्याचा आरोप महाकाली 'गुंफेत शिरलेल्या किटल्यांनी' केला आहे. मात्र बिल्डरांचे, व्यापाऱ्यांचे, दलालांचे राज्य मोडून येथे लोकांच्या मनातले राज्य आणले, हीच या गळक्या किटल्यांची खरी पोटदुखी आहे. राज्य सरकारने उद्योगधंद्यांसाठी काही केले की म्हणायचे, सरकार भांडवलदारांचे धार्जिणे आहे. सरकारने नटीच्या बेकायदा बांधकामावर हातोडा मारला की बोलायचे, हा तर एका अबलेचा अपमान आहे, पण हे बोलतोय कोण, तर ‘‘पोरी पळवून आणू व लग्न लावून देऊ’’, अशा बतावण्या करणारे भाजपचे आमदार. हा मात्र अबलांचा अपमान ठरत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखातून केली आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरली जाते. वहिनी, आपण सामनाच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापून येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. मी आपणास एक व्यक्ती म्हणून चांगले ओळखतो आणि मला खात्री आहे की आपणालाही ही भाषा आवडत नसेल,’ असे चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात म्हटले होते. तसेच संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा, अशी माझी आपणास विनंती आहे. माझी ही विनंती आपणास योग्य वाटत नसेल आणि आपल्या वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल, तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे सांगितले होते. 

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut has again criticized BJP leader Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.