जुमल्यांमुळे देशाचा घात; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 20:49 IST2018-08-13T20:31:46+5:302018-08-13T20:49:10+5:30
मोदींनी खोटेपणातून भ्रमाचे भोपळे बनवल्याची टीका

जुमल्यांमुळे देशाचा घात; उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात
मुंबई: जुमल्यांमुळे देशाचा घात झाला, अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. मोदींनी खोटेपणातून भ्रमाचे भोपळे बनवले. या सरकारकडून नुसता बोलघेवडेपणा सुरू आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे मोदी सरकारवर बरसले. यासोबतच उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारचाही समाचार घेतला. राज्यातील जनतेला रस्त्यावर का उतरावं लागतं, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. ते 'मार्मिक'च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'च्या मुद्दावरुन विधी आयोगाला पत्र लिहिल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर शरसंधान साधलं. एकदाच सर्वांना मूर्ख बनवण्याची संधी म्हणून भाजपाकडून 'वन नेशन वन इलेक्शन'चा इतका आग्रह धरला जात आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 'सरकारकडून फक्त आणि फक्त बोलघेवडेपणा सुरू आहे. पंतप्रधान मोदी लाखो रोजगार निर्माण झाल्याचा दावा करतात. तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नितीन गडकरी रोजगार आहेत कुठे?, असा प्रश्न विचारतात. त्यामुळे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी फक्त आश्वासनांचे भोपळे निर्माण केले, असं टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी सोडलं. 'अच्छे दिन आणण्याचं आश्वासन मोदींनी जनतेला दिलं होतं. त्यामुळे ते सत्तेत आले. मात्र त्यानंतर गडकरींनी एका कार्यक्रमात 'अच्छे दिन' म्हणजे आमच्या गळ्यातील हाडूक असल्याचं म्हटलं होतं. मोदींनी खोटेपणातून भ्रमाचे भोपळे बनवले,' असा टोलादेखील उद्धव ठाकरेंनी लगावला. 15 ऑगस्टला काय बोलावं, यासाठी मोदींनी जनतेकडून मुद्दे मागितले होते. यावरुनही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. जे काही बोलाल, ते खरं बोला, असा सल्ला त्यांनी मोदींना दिला. 'काय बोलावं, असा प्रश्न आम्हाला कधीच पडत नाही. कारण जनतेशी आमचा सतत संवाद सुरू असतो,' असा चिमटादेखील उद्धव ठाकरेंनी काढला.