''तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावं,'' शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:35 AM2019-10-31T10:35:27+5:302019-10-31T11:15:21+5:30

शिवसेना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सत्तेच्या वाटपावरून भाजपावर निशाणा साधला.

Shiv Sena aggressive for CM post | ''तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावं,'' शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं

''तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावं,'' शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं

Next

मुंबईः शिवसेना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सत्तेच्या वाटपावरून भाजपावर निशाणा साधला. सत्तेच्या पदांचं समसमान वाटप व्हावं. जे हक्काचं आहे, न्यायाचं आहे, त्याविषयी आम्ही बोलतोय. युती आहे आणि युतीमध्ये बोलणी होऊ शकतात. भाजपावाले म्हणाले होते, सत्तेचं समसमान वाटपं होईल, मग सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रिपद येत नाही काय?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेनं कुठलंही पाऊल मागे घेतलेले नाही. मुख्यमंत्रिपद हे एनजीओचं पद आहे काय?, मुख्यमंत्रिपद हे सत्तेचं पद आहे. समसमान वाटप म्हणजे सर्वच पदांचं 50-50 वाटप करणं असतं. शिवसेना कोणत्याही पदांसाठी अडून बसलेली नाही. भाजपानं सामंजस्यानं घ्यायला हवं. विनाशकाले विपरित बुद्धी आमची नव्हे, तर त्यांची झाली आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी मुनगंटीवारांवर केली आहे. भाजपाजवळ 145चा आकडा असल्यास त्यांनी केव्हाही सरकार स्थापन करावं. भाजपाच नव्हे, तर इतर कोणाकडेही 145 आमदारांचं समर्थन असल्यास त्यांनी खुशाल सरकार तयार करावं, असं म्हणत त्यांना भाजपाला टोलाही हाणला आहे.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सरकार स्थापनेवरून आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणाऱ्या शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या संजय राऊत यांनी आज काहीसा नरमाईचा पवित्रा घेतल्याचे दिसून आले. युतीमध्ये राहण्यातच शिवसेना आणि भाजपाचं तसंच राज्याचं भलं आहे, असे राऊत यांनी सांगिलते. भाजपाने मंत्रिमंडळातील खात्यांच्या दिलेल्या प्रस्तावाबाबत विचारणा केली असता राऊत म्हणाले की, ''आम्ही येथे खाती वही घेऊन बसलेलो नाही. काही बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रसारमाध्यमेही बातम्या पसरवत आहेत, याला पुड्या सोडणे म्हणतात, असा टोला राऊत यांनी लगावला. 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून चढाओढ सुरूच आहे. एकीकडे शिवसेनेने थेट मुख्यमंत्रिपदावरच दावा ठोकला आहे. तर भाजपा मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापनेचा मुहुर्त लांबत चालला आहे. 

Web Title: Shiv Sena aggressive for CM post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.