Shiv Sena Bkc Sabha: शिवसंपर्क अभियान: हिंदुत्व, विकासकामे, महागाई; शिवसेनेच्या सभेची त्रिसूत्री, अयोध्या दौरा १५ जूनला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:31 AM2022-05-15T05:31:35+5:302022-05-15T05:32:23+5:30

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अयोध्या दौरा १५ जूनला होणार आहे, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली.

shiv sampark abhiyan hindutva development work inflation trisutri of shiv sena sabha ayodhya tour on 15th june | Shiv Sena Bkc Sabha: शिवसंपर्क अभियान: हिंदुत्व, विकासकामे, महागाई; शिवसेनेच्या सभेची त्रिसूत्री, अयोध्या दौरा १५ जूनला

Shiv Sena Bkc Sabha: शिवसंपर्क अभियान: हिंदुत्व, विकासकामे, महागाई; शिवसेनेच्या सभेची त्रिसूत्री, अयोध्या दौरा १५ जूनला

Next

गौरीशंकर घाळे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा वारसा, दुसरीकडे कोविडकाळात राज्य सरकारने केलेल्या कामांची जंत्री आणि त्यानंतर वाढती महागाई, बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड, हीच त्रिसूत्री शिवसेनेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जाहीर सभेत पाहायला मिळाली. स्वतः पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. 

शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात वांद्रे येथील सभेने करण्यात आली. या वेळी आदित्य यांनी लाॅकडाऊन आणि महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंध लावत होतो. मात्र, केंद्र सरकारने एका झटक्यात लाॅकडाऊनची घोषणा केली. तरीही आपण डगमगलो नाही. कोरोना काळात जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाइव्ह करायचे तेव्हा कोणी मुख्यमंत्री निर्देश देत आहे, असे वाटायचे नाही. तर, एक कुटुंबप्रमुख काळजी कशी घ्यायची हे सांगतोय, असे वाटायचे. आपले नेतृत्व हे असे संवेदनशील असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तर, महागाई कुठे वाढली, थोडीच वाढली, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. ही यांची संवेदनशीलता, असा टोलाही त्यांनी लगावला. 

मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या अडीच वर्षांतील कामांचा लेखाजोखा मांडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवत हिंदुत्वाच्या वारशाचा दाखला दिला. तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांवरून भाजपवरही या सभेच्या माध्यमातून निशाणा साधला.

शिवसेनेचा अयोध्या दौरा १५ जूनला

- राज्यसभेच्या निवडणुका लागल्याने शिवसेनेचा अयोध्या दौरा पाच दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हा अयोध्या दौरा आता १० जूनऐवजी १५ जूनला होणार आहे, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली.

- राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून आमदार आणि खासदारांना आपापल्या राज्यात असावे लागते. त्यामुळे हा दौरा आता १० जूनऎवजी १५ जूनला होईल. श्रीरामासमोर महाराष्ट्र नतमस्तक होईल, असे राऊत म्हणाले.

तुमच्यात बाळासाहेब दिसले - आदित्य ठाकरे

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आदित्य ठाकरे उपस्थित जनसमुदायासमोर नतमस्तक झाले. सभेची पहिली रांग वांद्र्यात तर शेवटची रांग कुर्ल्यात आहे. गर्दी पाहून मलाही चालत यावेसे वाटले. या गर्दीत मला पंचमुखी हनुमान दिसले, रामसीता  दिसले, भगवान शंकर दिसले, विघ्नहर्ता गणपती दिसले. हे शिवसैनिक आमची कवचकुंडले आहेत. आज तुमच्यात मला माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसले, माझी आजी दिसली. त्यामुळे नतमस्तक झालो, असे भावनिक उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले.

तुमच्या टेकूची गरज नाही - एकनाथ शिंदे

ईडा-पिडा मागे लागली म्हणून शिवसेना घाबरणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांची गैरवापर लोकशाहीसाठी योग्य नाही. शिवसेनेवर होणाऱ्या वायफळ टीकेला विकासकामे हेच उत्तर आहे. राज्यात सुरू असलेली विकासकामे जेव्हा पूर्ण होतील तेव्हा महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदललेला असेल. भोंगे, हिंदुत्वाचा वाद मुद्दाम उकरून काढले जात आहेत. काही नवीन हनुमान भक्त हनुमान चालीसाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा द्रोणागिरी उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, तो बाळासाहेबांनी आधीच उचलला आहे. त्याला तुमच्या टेकूची गरज नाही, तुम्हाला ते जमणारही नाही, झेपणार नाही.

आमचा बाप बाळासाहेब - संजय राऊत 

शिवसेना कोणापुढे वाकणार नाही,  ना कोणापुढे झुकणार नाही. आम्ही संघर्ष करत राहू. आजची सभा शंभर सभांची बाप आहे. आजची सभा हेच सांगते की, मुंबईचा बाप शिवसेना फक्त शिवसेना आहे. पाहायचं असेल, आजमवायचं असेल तर मुंबईत या. मुंबईचा बाप शिवसेना असून आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, असे खा. संजय राऊत म्हणाले.

Web Title: shiv sampark abhiyan hindutva development work inflation trisutri of shiv sena sabha ayodhya tour on 15th june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.