'संजय राऊत, उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी त्यांचा महापौर...', शिंदेंचा नेता उद्धवसेनेवर भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:50 IST2026-01-19T20:42:44+5:302026-01-19T20:50:06+5:30
BMC Mayor Shinde Shiv Sena: मुंबई महापालिका निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे उत्सुकता ताणली गेली आहे. विरोधकांकडून वेगवेगळी विधाने केली जात असताना शिंदेंच्या नेत्याने पलटवार केला आहे.

'संजय राऊत, उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी त्यांचा महापौर...', शिंदेंचा नेता उद्धवसेनेवर भडकला
BMC Mayor News: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिंदेसेना युतीला स्पष्ट बहुतम मिळाले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे २९ नगरसेवकच हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवल्याने युतीतील राजकारण चर्चेचा मुद्दा बनले आहे. महापौर पदाच्या निवडीवरून आता विरोधकही शिंदेंसेनेला लक्ष करत आहेत. खासदार संजय राऊत यांच्याकडून झालेल्या टीकेला शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची खिल्ली उडवत त्यांनी महापौर पदाबद्दल भाष्य केले आहे.
ठाकरे, राऊत उलटे लटकले तरी महापौर होणार नाही
संजय निरुपम यांनी एक पोस्ट करत म्हटले आहे की, "उबाठा नेते आणि माध्यमांमध्ये मुंबईच्या पुढच्या महापौराबद्दल फारच अस्वस्थता आहे. सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी त्यांच्या महापौर होणार नाही."
पुढे संजय निरुपम म्हणाले की, "पहिले कारण म्हणजे मुंबईतील मतदारांनी उबाठाच्या २७ वर्षांच्या भ्रष्टाचाराविरोधात जनादेश दिला आहे. त्यामुळे त्यांना विरोधी बाकावर बसण्यासाठीच जागा जिंकून दिल्या आहेत."
आम्हाला त्यांच्या मताची गरज नाही
"दुसरे कारण म्हणजे मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल आणि मुंबईच्या मतदारांनी त्यासाठीच आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. उबाठाचे नगरसेवक महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करो वा न करो, काय फरक पडणार आहे? आम्हाला त्यांच्या मतांची गरजच नाही", असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
"याच दरम्यान, काही अज्ञानी आहेत, जे दररोज महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख बघत आहेत. त्या मुर्खांना सांगू इच्छितो की, जोपर्यंत महापौर पदासाठी आरक्षण लॉटरी निघत नाही, तोपर्यंत निवडणूक कशी होईल? लॉटरी काढण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. हे काम नगरविकास मंत्रालयाचे आहे आणि त्यांची तयारी सुरू आहे", असे म्हणत निरुपमांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे.
एकनाथ शिंदेंचं महापौर पदाच्या मागणीबद्दल म्हणणं काय?
"शिवसेना आणि भाजपा हे मुंबई महापालिकेत युतीत एकत्र निवडणूक लढले. मुंबईत महायुतीचा महापौर होईल. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह युती म्हणून जिथे-जिथे एकत्र निवडणूक लढलो आहोत, त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल", असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर भाजपाचा होईल की शिंदेसेनेचा, याबद्दल स्पष्ट बोलणे टाळले.