Join us
Daily Top 2Weekly Top 5

“महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका, नैतिकता शिल्लक असेल तर अमित शाह यांनी राजीनामा द्यावा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:39 IST

Sanjay Raut News: उद्धव ठाकरे शरण गेले नाहीत, हा तुमचा राग आहे. बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही स्वार्थासाठी फोडली. त्याकरिता बाळासाहेबांन मिठी मारली असती काय? अशी विचारणा करण्यात आली आहे.

Sanjay Raut News: ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने जगाला मजबूत संदेश दिला आहे. पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला जगभरात पाठविण्याचा निर्णय झाला. परंतु त्यावर उद्धवसेनेच्या एका खासदाराने ही कुणाची वरात चालली म्हणून टीका केली. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींची गळाभेट घेतली असती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धवसेनेवर टीका केली. या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. नैतिकता शिल्लक असेल, तर अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा संजय राऊत यांनी पुनरुच्चार केला. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतीन यांच्या बाबतीत उल्लेख केला आहे की, त्यांचे डोके ठिकाणावर नाही. मला असे वाटते की, आपल्या सत्ताधाऱ्यांनासुद्धा तोच शब्द लागू पडतो. पहलगाममध्ये २६ माता भगिनींचे कुंकू पुसले गेले. त्यामुळे सगळ्यात आधी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा. या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर अमित शाह जबाबदार आहेत. गृहखात्याचे काम हे अत्यंत अपयशी आणि बिनडोक पद्धतीचे आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका, नैतिकता शिल्लक असेल तर अमित शाह यांनी राजीनामा द्यावा

आधी ४० जवान मारले गेले, त्यानंतर २६ महिलांच्या कपाळावरचे कुंकू पुसले, त्याला जबाबदार कोण? आणि हे आम्हाला शिकवणार? अमित शाह आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाणांकडे जाऊन आमरस पुरी खायला बसले. देशात काय चालले आहे? अमित शाह यांचा राजीनामा घ्या. राजीनामा घेण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे. शिवसेनाप्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता की, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना वाचवले. कोणाला खुनातून वाचवले आणि कोणाचे मुख्यमंत्रीपद वाचवले. नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका. तुमचे काय कर्तृत्व आहे?, असा सवालही संजय राऊतांनी केला. 

दरम्यान,  उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत, हा तुमचा राग आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली. त्याकरिता बाळासाहेब ठाकरेंनी मिठी मारली असती काय? हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत आहात. महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरअमित शाहसंजय राऊतशिवसेनाबाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरे