“मुंबई बुडाली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारले की एकनाथ कुठे?”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:19 IST2025-05-27T13:17:48+5:302025-05-27T13:19:42+5:30

Sanjay Raut News: भारतीय जनता पक्ष व्यापारांचा, शेठजींचा पक्ष आहे. शेठजींनी मुंबई आणि महाराष्ट्राचे भवितव्य ठरवू नये, अशी टीका संजय राऊतांनी केली.

sanjay raut criticized deputy cm eknath shinde over mumbai rain impact citizen | “मुंबई बुडाली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारले की एकनाथ कुठे?”: संजय राऊत

“मुंबई बुडाली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारले की एकनाथ कुठे?”: संजय राऊत

Sanjay Raut News: नैऋत्य मोसमी पावसाने अखेर २६ मे रोजी मुंबईत आपली 'अॅडव्हान्स एन्ट्री' केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. सोमवारचा दिवस पावसाच्या रौद्र रूपासह उजाडल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. भुयारी मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक वरळी स्थानकातही पावसाचे पाणी शिरले. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण आणि लगतच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईत महापूर आला. ही जबाबदारी कोणाची आहे, तर एकनाथ शिंदेंची आहे. ते नगरविकासमंत्री आहेत. महापालिका कोणाकडे आहे? मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारले की, एकनाथ कुठे आहे? मुंबई आणि ठाणे बुडाले एकनाथ कुठे? एकनाथ शिंदे अमित शाहा यांचे लांगुलचालन करण्यात व्यस्त आहेत. एकनाथ कुठे तर महाराष्ट्रद्रोह्यांच्या लांगुलचालनात आहे. अमित शाह यांनी आम्हाला सांगू नये. हे शेअर बाजारातील दलाल आहेत. त्यांना मुंबई जुगारावर लावायची आहे. भारतीय जनता पक्ष व्यापारांचा पक्ष आहे. हा शेठजींचा पक्ष आहे. शेठजींनी मुंबई आणि महाराष्ट्राचे भवितव्य ठरवू नये, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

जनतेचे हजारो कोटी बुडाले

साडेतीन वर्ष सत्ता कोणाच्या ताब्यात आहे. काही झाले की, पंडित नेहरु आणि मनमोहन सिंग यांचे नाव काढतात. अरे दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे. साडेदहा वर्षे मोदी-शाह यांच्या हातात सत्ता आहे. मुंबईची सत्ता साडेतीन वर्ष झाले शिंदे आणि फडवणीसांच्या हातात आहेत. मोठा गाजावाज करत मुंबईतील भुयारी मेट्रोचे उद्घाटन केले. जनतेचे हजारो कोटी बुडाले, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

दरम्यान, मुंबईत अनेक भागांत सोमवारी पावसाचे पाणी भरले, लोकल ट्रेन उशिराने धावत होत्या. अनेक नागरिकांची गैरसोय झाली, यातून सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी 'शिवसैनिकांनो रस्त्यावर उत्तरा,' असे आदेश उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. पहिल्या पावसामुळे मुंबईत नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कामावर निघालेला नोकरदार अनेक ठिकाणी अडकला आहे. शिवसैनिकांनी मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरावे, असे ठाकरे यांनी संदेशात म्हटले.

 

Web Title: sanjay raut criticized deputy cm eknath shinde over mumbai rain impact citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.