15 लाख लोकांच्या डोक्यावर छत, महाआवास योजनेंतर्गत मिळाली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:15 PM2021-06-16T15:15:50+5:302021-06-16T15:17:33+5:30

सह्याद्री अतिथृगृह येथे आज हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या, तर याचवेळी ई-गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात चाव्यांचे वितरण करण्यात आले.

Roofs on the heads of 15 lakh people, got houses under Mahaawas Yojana, says cm uddhav thackeray | 15 लाख लोकांच्या डोक्यावर छत, महाआवास योजनेंतर्गत मिळाली मदत

15 लाख लोकांच्या डोक्यावर छत, महाआवास योजनेंतर्गत मिळाली मदत

Next
ठळक मुद्दे ३ लाख २२ हजार ९२९ घरकुलात राहणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षात घेतली तर आज १५ लाख लोकांच्या डोक्यावर महाआवास अभियानातील घरकुलांनी छत उपलब्ध करून दिले आहे

मुंबई - ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानाअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी मंगळवारी गृहप्रवेश केला. त्याचबरोबर या अभियानाअंतर्गत सुमारे 4 लाख 68 हजार घरकुलांची बांधकामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून ती महिन्याभरात पूर्ण होऊ शकतील. अशा पद्धतीने या अभियानातून कमी कालावधीत सुमारे आठ लाख कुटुंबांना घरकुलाचा लाभ देऊन ग्रामविकास विभागाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आज काढले.

सह्याद्री अतिथृगृह येथे हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या, तर याचवेळी ई-गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात चाव्यांचे वितरण करण्यात आले. 
मागील दीड वर्षापासून राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आपण नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करत होतो. परंतू, घर नसलेल्यांनी घरात कसे राहायचे, भुमीहीनांनी घरात सुरक्षित कसे राहायचे हा प्रश्न होता, ज्याचे उत्तर आज ग्रामविकास विभागाने दिले असून अभियान कालावधीत 8 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट विभागाने निश्चित केले होते. त्यातील ३ लाख २२ हजारांहून अधिक घरकुले बांधून पूर्ण झाली ज्याच्या चाव्या आज आपण लाभार्थ्यांना देत आहोत, तर  उर्वरित 4 लाख 67 हजार 953  घरांचे काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे. 

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शासन अनेक योजना राबवते, त्यात अनेक योजना केवळ जाहीर होतात पण ग्रामविकास विभागाने जलदगतीने घरे बांधून गोरगरीबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्याबद्दल मी यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. ३ लाख २२ हजार ९२९ घरकुलात राहणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षात घेतली तर आज १५ लाख लोकांच्या डोक्यावर महाआवास अभियानातील घरकुलांनी छत उपलब्ध करून दिले आहे, त्यांना सुरक्षित केले आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अभियानात गवंडी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल विभागाचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, घरांच्या बांधणीसाठी लागणारे साहित्य महिला बचतगटांच्या “घरकुल मार्ट” मधून उपलब्ध करून देऊन त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे कामही विभागाने केले आहे. हे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करणारे शासन आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आज महाआवास अभियानातून हक्काचे घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी घराला, स्वत:च्या कुटुंबाला कोरोनामुक्त ठेवण्याचे वचन मला द्यावे, कारण यातूनच गाव आणि राज्याचा कोरानामुक्तीचा प्रवास यशस्वी होणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Roofs on the heads of 15 lakh people, got houses under Mahaawas Yojana, says cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.