Ramdesivir useful on corona; But don't use it unnecessarily | कोरोनावर रेमडेसिवीर उपयुक्त; मात्र विनाकारण वापर नको

कोरोनावर रेमडेसिवीर उपयुक्त; मात्र विनाकारण वापर नको

मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे काेराेना रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत हाेते, मात्र ते प्रत्येक रुग्णासाठी आवश्यक आहे, असे कुठेही म्हटलेले नाही, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. ॲण्टिव्हायरल असलेले आणि ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही लाभदायी ठरत असल्याचे निरीक्षण मुंबईतील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. मात्र विनाकारण वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ७० देशांतील २५० रुग्णालयांत एक चाचणी घेतली. यात त्यांनी कोरोनावर वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर, इंट्रोफिरॉन, लोपोनाईल, रोटोनाईल, टॉसिलीझुमॅब या औषधांची उपयुक्तता तपासली. त्यातील हाड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन आणि लोपोनाईल, रोटोनाईल ही औषधे जूनमध्येच बंद करण्यात आली. रेमडेसिवीरचा वापर योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे. रुग्णाच्या नातेवाइकांनी तसेच डॉक्टरांनीसुद्धा आवश्यकतेनुसार राज्य सरकारच्या टास्क फोर्सने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचा वापर करावा. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा जाणवणार नाही आणि गरजूंची अडचण होणार नाही. दरम्यान, अशाच पद्धतीने या इंजेक्शनचा वापर मुंबईत करण्यात येत असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा अतिगंभीर रुग्णांवर काहीच उपयोग होत नाही, मात्र प्राथमिक पातळीवर असणाऱ्या रुग्णाला हे इंजेक्शन दिल्यास तो रुग्ण गंभीर अवस्थेतही जात नाही. त्यामुळे आपल्याकडे या इंजेक्शनमुळे रुग्णांच्या प्रकृतीत फरक दिसत असल्याने याचा वापर केला जात आहे. द युनायटेड स्टेट फूड अँड ॲडमिनिस्ट्रेशन या उच्चस्तरीय ऑथोरिटीने या औषधाला मान्यता दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात ही संस्था प्रमाण मानली जाते, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

साैम्य लक्षणांसाठी गरज नाही
कमी लक्षणे, सौम्य लक्षणे असलेले काेराेना रुग्ण किंवा बाहेरून ऑक्सिजन देण्याची आवश्यकता भासत नाही अशा रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची गरज नाही. पहिल्या दहा दिवसांत ते दिल्यास परिणाम अधिक चांगले दिसतात. 
n योग्य मात्रा, योग्य वेळ आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे इंजेक्शन दिल्यास रुग्णावर त्या औषधाचे परिणाम दिसतात, अशी माहिती पालिकेच्या नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ramdesivir useful on corona; But don't use it unnecessarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.