Join us

पंतप्रधान मोदींना टोला हाणत राज ठाकरेंच्या मनमोहन सिंग यांना शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:41 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून मनमोहन सिंग यांना आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्याचे कौतुक करत नाव न घेता नरेंद्र मोदींना चिमटा काढला आहे. 

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज  86 वा वाढदिवस. मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून मनमोहन सिंग यांना आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्याचे कौतुक करत नाव न घेता नरेंद्र मोदींना चिमटा काढला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, देशाला आर्थिक उदारीकरणाच्या वाटेवर यशस्वीपणे नेणारे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांच्या आज वाढदिवस. 1991 नंतरच्या आर्थिक उदारीकरणाची फळं ज्यांनी चाखली, त्याच वर्गाने डॉ. मनमोहन सिंग ह्यांची निर्भत्सना करण्यात काही काळ पुढाकार घेतला होता. 

पण, देशाची अर्थव्यवस्था आर्थिक निरक्षरांनी गर्तेत ढकलली असताना, माझ्या सकट, तमाम भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव नक्कीच भासत आहे. अर्थमंत्री असताना असेल किंवा पंतप्रधान असताना असेल, तुम्ही देश ज्या पद्धतीने आर्थिक संकटातून बाहेर काढलात त्याचं महत्व, आजच्या आर्थिक अराजकतेच्या काळात जाणवत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

राजकारणात टीका होतच असते, ती कधी काळी आम्ही पण केली. पण चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याचं औदार्य आमच्याकडे नक्कीच आहे. डॉ. मनमोहन सिंग ह्यांच्या भाषणातलाच एक संदर्भ घेऊन म्हणेन '' इतिहास तुमच्या कार्याचं आणि योगदानाचं नक्कीच योग्य मूल्यांकन करेल.' असेही राज ठाकरे म्हणाले. 

 

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदीमनमोहन सिंगमनसे