हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:38 IST2025-07-02T12:38:08+5:302025-07-02T12:38:42+5:30
ठाकरे आणि गर्दी हे समीकरण आमच्यासाठी नवीन नाही. ५०-६० वर्ष आम्ही गर्दी बघतोय. कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या हे सांगण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं.

हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
मुंबई - हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यामुळे येत्या ५ जुलैला मनसे-उद्धवसेनेकडून वरळी येथे जल्लोष मेळावा आयोजित केला आहे. वरळीतील डोम येथे हा मेळावा पार पडेल. या मेळाव्याची दोन्ही पक्षाकडून जोरदार आखणी करण्यात येत आहे. आज वरळी डोममध्ये शिवसेनेकडून अनिल परब, साईनाथ दुर्गे आणि मनसेकडून नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांनी पाहणी केली.
यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी या मोर्चात सहभागी होण्यासाठी सहकार्य केले त्या सगळ्यांना निमंत्रण पाठवले आहे. या मेळाव्याबाबत खुले निमंत्रण आहे. कोणाची भाषणे होणार हे ठरवले जाईल. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना यासाठी निमंत्रण दिले जाईल. पक्षविरहित हा मेळावा आहे. नेते जर आले तर नक्कीच त्यांची भाषणे होणार आहे. ठाकरे बंधू एकत्रित या मेळाव्यात दिसतील. ठाकरे आणि गर्दी हे समीकरण आमच्यासाठी नवीन नाही. ५०-६० वर्ष आम्ही गर्दी बघतोय. कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या हे सांगण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं.
तर ज्या कारणास्तव मराठीचा लढा उभा राहिला त्या हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतला. त्या मराठी माणसांचे अभिनंदन करतो. सक्तीचा निर्णय सरकारने घेतला तेव्हा मराठी माणूस एकवटला. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मराठी माणूस जसा एकत्र आला होता तसाच या निर्णयाविरोधात एकजूट होईल अशी भीती सरकारच्या मनात होती. त्यामुळेच सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला असा टोला उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी महायुतीला लगावला.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आणखी एक खुलं पत्रक काढले आहे. त्यात महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचा आहे. मग ही सुरुवात आहे असं सांगत आपल्याला जाहीर खुलं आमंत्रण आहे असं म्हटले आहे. वरळीतील डोम येथे ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता हा जल्लोष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांकडून तयारी सुरू आहे. यात ठाकरे बंधू एकत्रित दिसणार असल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.