लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:53 IST2026-01-08T09:52:20+5:302026-01-08T09:53:05+5:30
Mahesh Manjrekar on Mumbai: मुंबईतील ट्रॅफिक, ५१ लाख गाड्या आणि पाण्याचा भेदभाव यावर महेश मांजरेकर यांनी विचारले रोखठोक सवाल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विनाशाला जबाबदार कोण? याचे दिले उत्तर.

लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...
"नव्या इमारतींना २४ तास पाणी आणि मध्यमवर्गीयांच्या इमारतीला फक्त २-३ तास? जिथे १० मिनिटं लागायची तिथे आता १ तास लागतोय," अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुंबईकरांच्या दैनंदिन नरकयातनांचा पाढा वाचला. 'सामना'च्या विशेष मुलाखतीत मांजरेकर यांनी विचारलेल्या धारदार प्रश्नांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विद्रुपीकरणाचे आणि नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढले.
यावर राज ठाकरे म्हणाले की, "सरकारी जमिनींना आई-बापच उरलेला नाही" मुंबईतील वाढत्या गर्दीवर आणि अनधिकृत बांधकामांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत जमिनींचे चार मालक आहेत - केंद्र, राज्य, महापालिका आणि खाजगी. "बघा, गोदरेजच्या खाजगी जागेवर तुम्हाला एकही झोपडी दिसणार नाही, पण सरकारी जमिनींना मात्र आई-बापच नाही. तिथे अनधिकृत गोष्टींना ऊत आला आहे," अशी टीका त्यांनी केली. तसेच, जोपर्यंत प्रशासनाचा कडक वचक निर्माण होत नाही, तोपर्यंत मुंबई डिकन्जेस्ट (गर्दीमुक्त) होणे कठीण आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री आणि सरकारवर निशाणा साधला. "आजचे राज्यकर्ते मुंबईकर नाहीत, ते कंत्राटदारांचे लाडके आहेत. दुर्दैवाने आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत. जरी ते मराठी असले तरी त्यांना मुंबईकरांच्या समस्यांशी काहीही देणंघेणं नाही. हे सरकार फक्त कंत्राटदारांसाठी काम करत आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी केला. सत्तेसाठी शहराचा बट्ट्याबोळ केला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
महेश मांजरेकर काय म्हणाले...
लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांनी प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले आपण, याला तोडत मांजरेकर यांनी मध्यमवर्गीय माणूस असे सांगितले. आज मुंबईत ज्या नवीन बिल्डिंग होतात, तिकडं २४ तास पाणी असतं. माझ्या छोट्या बिल्डिंगला २ तास आणि ३ तास. बाहेर पडलो तर जिथं दहा मिनिटं लागत होती, तिथं मला एक तास लागतो. यात गर्दीचा मुद्दा येतो. आता मुंबई डिकन्जेस्ट करण्याची गरज आहे. माझं असं म्हणणं आहे की आलेत ते राहू द्या, ते आता मुंबईकर झालेत. पण आता जागा नाही हेही समजवायला पाहिजे... ५१ लाख गाड्या झाल्यात मुंबईत, असा मुद्दा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शषक महेश मांजरेकर यांनी मांडला.