Join us

राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:43 IST

Raj Thackeray MNS Meeting at Shivaji Park cancelled: शिवाजी पार्क शिवतीर्थावर १७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेने अर्ज दाखल केला होता. त्यांना त्यासाठी परवानगीही मिळाली. पण आता तेथे सभा न घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे.

Raj Thackeray MNS Meeting at Shivaji Park cancelled: प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान राज ठाकरेंच्यामनसेला मिळणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठा गटाला मिळणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर या सभेसाठी मनसेला परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परंतु सभेला परवानगी मिळूनही १७ नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आले. मनसेने उद्धवसेनेच्या आधी अर्ज केल्याने त्यांना ही परवानगी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे. पण परवानगी मिळण्यास खूप उशीर झाला असून तयारीला पुरेसा वेळ मिळणार नसल्याने ही सभा घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

१७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तीनही पक्षांनी अर्ज केले होते. यामध्ये राज ठाकरेंनी प्रथम अर्ज केल्याने त्यांना सभेची परवानगी मिळाली. मात्र आता राज ठाकरे १७ नोव्हेंबरला सभा घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. राज ठाकरेंनी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

मनसेने सांगितलं कारण

मनसेचे अविनाश अभ्यंकर म्हणाले, "सकाळी ११.३२ वाजता राज ठाकरेंनी सांगितले की अद्याप परवानगी मिळालेली नाही त्यामुळे आम्ही सभा घेणार नाही. सकाळी ११.४० नंतर पालिकेकडून फोन आला की तुम्हाला परवानगी देण्यात आलेली आहे. पण इतक्या शॉर्ट नोटीसवर कमी कालावधीत तयारी करून इतकी मोठी सभा घेणे अशक्य आहे. पर्यंत काहीही आलेले नव्हते. त्यामुळे आयत्या वेळी उशिराने परवानगी दिल्यामुळे शिवाजी पार्क - शिवतीर्थावर सभा होणे शक्य नाही."

राज ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते?

"माझी १७ तारखेची शिवाजी पार्कवर सभा होती असं म्हणावं लागेल. मला अजून सरकारडून परवानगी आलेली नाही. आता माझ्याकडे फक्त दीड दिवस उरलेला आहे. तयारी करणं कठीण आहे. त्यामुळे सभा करणार नाही. त्याऐवजी मुंबई, ठाणे येथील इतर सभा होतील," असे राज यांनी ११.३२ वाजता म्हटले होते.

आता, राज यांनी सभा रद्द केल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे किंवा ठाकरे गटापैकी कुणाला परवानगी मिळते का, आणि परवानगी मिळाल्यास कुणाची सभा होते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४राज ठाकरेमनसेमुंबईएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेमुंबई महानगरपालिकामुंबई विधानसभा निवडणूक