Why I Killed Gandhi सिनेमा पंतप्रधान मोदी व अमित शाहांनी पाहिलाय का? निर्मात्या म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 22:04 IST2022-01-30T22:03:05+5:302022-01-30T22:04:21+5:30
Why I Killed Gandhi: या सिनेमाचा सिक्वेल येईल, तेव्हाही अमोल कोल्हे यांनाच नथुराम गोडसेची भूमिका करण्याबाबत पुन्हा विचारणा करणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.

Why I Killed Gandhi सिनेमा पंतप्रधान मोदी व अमित शाहांनी पाहिलाय का? निर्मात्या म्हणतात...
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केल्याबाबत राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून अनेकविध प्रतिक्रिया उमटल्या. आरोप-प्रत्यारोपही झाले. तो सिनेमा म्हणजे Why I Killed Gandhi असून, या चित्रपटाच्या निर्मात्या कल्याणी सिंग (Kalyani Singh) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. या सिनेमाबाबत वादाला तोंड फुटल्यामुळे २२ जानेवारी रोजीच तो रिलिज करण्यात आला, असे कल्याणी सिंग यांनी सांगितले. यावेळी हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पाहिला का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
आम्ही चित्रपट बनवला, तेव्हा असा विरोध होईल, असे वाटले नाही. या चित्रपटात निषेध करण्यासारखे काहीही नाही. ३० जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज करण्याचे ठरले होते. मात्र, वाद झाल्यानंतर चॅनलने सिनेमाच आधीच रिलीज करण्याचा निर्णय घेतला, असे कल्याणी सिंग यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी व अमित शाहांनी सिनेमा पाहिलाय का?
नथुराम गोडसेच्या पुस्तकात काय लिहिले आहे, ते आम्ही चित्रपटात दाखवले आहे. सार्वजनिक डोमिंगवर न्यायालयाची संपूर्ण सुनावणी आहे, त्यातून ही कथा घेण्यात आली आहे. सरकारमधील काही मंत्र्यांनी हा सिनेमा पाहिला आहे. कदाचित पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही हा चित्रपट पाहिला असेल, अशी शक्यता कल्याणी सिंग यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याचा फोन आलेला नाही किंवा विरोध करणाऱ्या कोणाचाही मला फोन आलेला नाही, असेही कल्याणी सिंग यांनी स्पष्ट केले. त्या टीव्ही९ शी बोलत होत्या.
अमोल कोल्हे तेव्हा खासदार नव्हते
अमोल कोल्हे यांना या चित्रपटात काम करण्याविषयी विचारले होते, तेव्हा ते खासदार नव्हते. जेव्हा या चित्रपटाचा सिक्वेल बनवेल, तेव्हाही अमोल कोल्हे यांनाच पुन्हा विचारणा करणार असल्याचे कल्याणी सिंग म्हणाल्या. तसेच या सिनेमाचा विरोध करणार्यांना विनंती करू इच्छिते की, तुम्ही हा चित्रपट एकदा पाहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.