कोरटकरने डेटा डिलिट करून दिला मोबाइल; पोलिसांची न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:03 IST2025-03-12T11:03:51+5:302025-03-12T11:03:58+5:30

अंतरिम जामिनात एक दिवसाची वाढ; युक्तिवादावर आज सुनावणी

Prashant Koratkar gave his mobile phone to the police after deleting the data | कोरटकरने डेटा डिलिट करून दिला मोबाइल; पोलिसांची न्यायालयात माहिती

कोरटकरने डेटा डिलिट करून दिला मोबाइल; पोलिसांची न्यायालयात माहिती

कोल्हापूर/मुंबई : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर याने डेटा डिलिट करून मोबाइल पोलिसांकडे सादर केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात दिली. दरम्यान, वकिलांच्या विनंतीनंतर दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी कोरटकरच्या अंतरिम जामिनात एक दिवसाची वाढ केली. त्याने सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहावे की नको, याबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. त्यावर आज, बुधवारी सुनावणी होईल.

संशयित कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच त्याने पत्नीकरवी त्याचा मोबाइल नागपूर सायबर पोलिसांकडे सादर केला. न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर पोलिसांनी तो जुना राजवाडा पोलिसांना दिला. मात्र, मोबाइलमध्ये कॉल डिटेल्स असले तरी संभाषणाचे रेकॉर्डिंग नाही. डेटा डिलिट करून त्याने मोबाइल पोलिसांकडे सादर केल्याची माहिती न्यायालयात दिली.

सुनावणीचे कामकाज सुरू होताच कोरटकरच्या वकिलांनी आणखी एक दिवस अंतरिम जामीन वाढवून मागितला. त्याला न्यायाधीशांनी परवानगी दिली. त्यानंतर कोरटकरने सुनावणीसाठी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे, असा अर्ज पोलिसांनी केला. त्याला कोरटकरच्या वकिलांना आक्षेप घेतला.

सरकारची बाजू ऐकून घ्या
उच्च न्यायालय तत्पूर्वी कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेताना राज्य सरकारची बाजू ऐकून घ्या. 

अर्जाच्या गुणवत्तेच्या आधारे निर्णय घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाला मंगळवारी दिले. अटकेच्या भीतीने त्याने कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. 

सत्र न्यायालयाने १ मार्चला कोरटकरला अटकेपासून अंतरिम संरक्षण देत पुढील सुनावणी ११ मार्चला ठेवली. सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
 

Web Title: Prashant Koratkar gave his mobile phone to the police after deleting the data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.