पोस्टाची कोट्यवधींची तिकिटे छापून अर्ध्या किंमतीत विक्री; रॅकेट उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 09:42 IST2025-10-22T09:41:51+5:302025-10-22T09:42:31+5:30
मुंबई, दिल्ली, बिहारमधून तिघांना बेड्या; आठ काेटींची माया जमवल्यानंतर अडकले जाळ्यात

पोस्टाची कोट्यवधींची तिकिटे छापून अर्ध्या किंमतीत विक्री; रॅकेट उद्ध्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशभरात पोस्ट तिकिटांचा बनावट धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांच्या कारवाईतून समोर आला आहे. पोलिसांनी मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कोट्यवधींची बनावट तिकिटे छापून अर्ध्या किमतीत विकली असून आरोपींनी बनावट तिकिटांच्या माध्यमातून तब्बल ८ कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती उघड झाली आहे.
या कारवाईत मुंबईचा रहिवासी राकेश बिंद (वय ४२), दिल्लीचा शमशुद्दीन गफ्फार अहमद (३५) आणि बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी शाहिद रझा (३५) यांना अटक करण्यात आली आहे. बिंद हा पोस्टाचा अधिकृत एजंट असून त्याच्याकडे तिकीट विक्रीचा परवाना होता. मात्र, त्याने आपल्या पदाचा गैरवापर करत दिल्ली व बिहारहून बनावट तिकिटांची खरेदी करून ती ग्राहकांना अर्ध्या किमतीत विकण्यास सुरुवात केली. अहमद आणि रझा हे बनावट तिकिटांचे छपाईकार असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर नकली तिकिटे तयार केली.
अन् संशय बळावला...
एक वित्तीय कंपनी मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार करत होती. त्यांनी १० व १३ जून रोजी सुमारे १२ हजार पत्रे राकेश बिंदमार्फत पाठविली. या पत्रांवरील तिकिटांवरून संशय बळावला. चौकशीत बिंद याने अहमद आणि रझाकडून अर्ध्या दराने बनावट तिकिटे विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ या दोघांचा शोध घेत १६ ऑक्टोबर रोजी त्यांना अटक केली. सध्या हे तिघेही पोलिस कोठडीत असून चौकशीदरम्यान आणखी मोठे घोटाळे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी अजून किती बनावट तिकिटे बाजारात फिरत आहेत आणि यामागे आणखी किती कुणाचा हात आहे, याचा तपास सुरू केला आहे.
त्या पाच पत्रावरील तिकिटाने कोट्यवधीचा घोटाळा उघड
गेल्या महिन्यात भोपाळ पोस्ट कार्यालयाने मुंबईहून आलेल्या पाच पत्रांवरील तिकिटे बनावट असल्याचा संशय व्यक्त करून मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांना गोपनीय पत्र पाठविले. या तिकिटांची तपासणी नाशिक येथील शासकीय छापखान्यात झाली असता, ती खरोखरच बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोस्ट निरीक्षक आशुतोष कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.