आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 06:03 IST2024-05-17T06:03:13+5:302024-05-17T06:03:57+5:30
वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे, तर काही रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गासह इतर मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. परिणामी, खबरदारी म्हणून यादरम्यान येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. येथील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे, तर काही रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, केळूस्कर रोड, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, एल. जे. रोड, एन. सी. केळकर मार्ग, टी. च. कटारिया मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, टिळक रोड, खान अब्दुल गफारखान रोड, थडानी मार्ग, डॉ. ॲनी बेझंट मार्गावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मेळाव्याकरिता येणाऱ्या बस सेनापती बापट मार्ग, माहीम रेल्वे स्थानक ते टिळक पुलापर्यंत, रेती बंदर (माहीम जंक्शन), लेडी जहांगिर रोड, पारेख मार्ग (माटुंगा), लोढा सार्वजनिक वाहनतळ (लोअरपरळ), कामगार मैदान, कोहिनूर सार्वजनिक वाहनतळ, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, रहेजा सार्वजनिक वाहनतळ, पांडुरंग बुधकर मार्ग, दूरदर्शन गल्ली आणि सासमीरा रोड येथे उभ्या करता येतील, असे पोलिसांनी कळविले आहे.