भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:38 IST2026-01-08T13:37:59+5:302026-01-08T13:38:40+5:30
भाजपच्या विस्तारवादी भूमिकेवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मी घाबरत नाही असं म्हटलं.

भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
Eknath Shinde: महायुतीमधील दोन मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कार्यकर्ते फोडाफोडीच्या राजकारणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भाजपकडून शिवसेनेच्या मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याचे सत्र सुरू झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये भाजप तुम्हाला संपवेल अशी भीती वाटते का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने भाजप विस्तार करत आहे, त्यातून शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, "ज्याला स्वतःच्या कामावर आत्मविश्वास नसतो, तेच लोक अशा गोष्टींना घाबरतात. मी घाबरत नाही. आम्ही आमची ताकद कामाच्या जोरावर निर्माण केली आहे."
भाजपच्या विस्तारवादी भूमिकेवर बोलताना शिंदे यांनी सकारात्मक पवित्रा घेतला. "भाजप सगळं कशाला ताब्यात घेईल? एनडीए मजबूत करण्यासाठी आज सगळे प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी एनडीएच्या प्रत्येक बैठकीला, सभांना बोलवलं जातं, आत्मसन्मान दिला जातोय. खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूरनंतर परदेशात शिष्टमंडळ पाठवण्यात आले. त्यामुळे ते कशाला थांबवतील. त्यांना उलट अशा पक्षांची आवश्यकता आहे जे प्रामाणिक आहे आणि ज्यांची विचारधारा एक आहे. आम्हाला स्वार्थ नाही. आम्हाला जनतेसाठी करायचं आहे. त्यामुळे ती भीती नाही. ज्याला त्याच्या अस्तिवाची खात्री नसते, त्याला त्याच्या कामावर आत्मविश्वास नसतो त्याला असुरक्षितता वाटते," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी ठाणे, पालघर आणि कोकणातील शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. ही नाराजी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एक अलिखित करार झाला आहे की, 'महायुती टिकवण्यासाठी यापुढे एकमेकांचे पदाधिकारी किंवा महत्त्वाचे कार्यकर्ते फोडले जाणार नाहीत.'
महाराष्ट्रासाठी जे काही मागतो ते अमित शाहांकडून मिळतं - एकनाथ शिंदे
"भाजपला कुबड्या दूर करायच्या आहेत हे अमित शाहांचे वक्तव्य विरोधकांसाठी होतं. २०२२ मध्ये सरकार बदललं तेव्हा अमित शाह यांनी मदत केली. त्यावेळी त्यांनी सहकार्य केलं त्यामुळे त्यांचा योगदान नाकारु शकत नाही. महाराष्ट्रासाठी जे काही मागतो ते त्यांच्याकडून मिळतं आणि त्यासाठी त्यांच्याकडे जात असतो. मी एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यांना धाडसी आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेला माणूस आवडतो," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.