एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 05:48 IST2025-12-16T05:47:43+5:302025-12-16T05:48:23+5:30
यंदा दुबार मतदारांची संख्या सुमारे ११ लाखांनी वाढली. त्यात एकाच व्यक्तीची अनेक वॉर्डात नावे आहेत, तर प्रत्यक्षात चार लाख ३० हजार दुबार नावे आहेत.

एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एक कोटी तीन लाख ४४ हजार ३१५ मतदारांची नोंदणी झाली असली तरी, सुमारे एक लाखापेक्षा जास्त दुबार नावे वगळली जातील, असे संकेत पालिकेच्या निवडणूक विभागाने दिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात एक कोटी दोन लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे.
यंदा दुबार मतदारांची संख्या सुमारे ११ लाखांनी वाढली. त्यात एकाच व्यक्तीची अनेक वॉर्डात नावे आहेत, तर प्रत्यक्षात चार लाख ३० हजार दुबार नावे आहेत, पालिकेने दुबार नावे वगळण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासणीत ५० हजारांपेक्षा जास्त दुबार नावे असलेले मतदार आढळून आले. अजून ४० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांची छाननी करायची आहे. त्यामुळे दुबार मतदारांची संख्या ८० ते १० हजारांच्या घरात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे.
१०,१११ मतदान केंद्रे
मुंबई शहर व उपनगरात १० हजार १११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांसाठी ११ हजार ३४९ कंट्रोल युनिट आणि २२ हजार ६६८ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
७०,००० कर्मचारी महापालिका प्रशासन निवडणुकीसाठी तैनात करणार आहे.
२०,००० मतदान यंत्रांची आवश्यकता आहे.
२२७ वॉर्डामध्ये मिळून ६,५०० बीएलओ
२९ बीलएलओ प्रत्येक वॉर्डात साधारणपणे असतील.
२३ मुख्य रिटर्निंग अधिकारी
२३ मुख्य रिटर्निंग अधिकारी असतील. त्यांच्या दिमतीला आणखी २३ रिटर्निंग अधिकारी असतील, म्हणजे एकूण ४६ अधिकारी असतील.
उपनगरात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली
मुंबई उपनगरात तृतीयपंथी मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. २०१७ मध्ये ३८१ तृतीयपंथी मतदार होते. यावेळी ही संख्या १,०९९ इतकी झाली आहे.