नारायण राणेंनी शड्डू ठोकला; रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेबाबत मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 05:08 PM2024-02-29T17:08:54+5:302024-02-29T17:10:33+5:30

नारायण राणे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा असतानाच, राणेंनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जागेवर दावा केला आहे

Narayan Rane struck Shaddu; Big announcement about Ratnagiri-Sindhudurg seat for bjp | नारायण राणेंनी शड्डू ठोकला; रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेबाबत मोठी घोषणा

नारायण राणेंनी शड्डू ठोकला; रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेबाबत मोठी घोषणा

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून लवकरच निवडणुकांची घोषणा होऊ शकते. तत्पूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून आघाडी आणि युतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्याचतच, कुठल्या जागेवर कोण उमेदवार राहिल, हेही काम जोरात सुरू असून पक्षांकडून लोकसभा मतदारसंघातील निरीक्षकांच्या नेमणुका केल्या जात आहेत. नुकतेच माजी केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा कार्यकाळ संपल्यामुळे आता त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. त्याच अनुषंगाने नारायण राणेंनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय बनलं आहे. 

नारायण राणे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा असतानाच, राणेंनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जागेवर दावा केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून २००९ साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही वेळा निलेश राणे पराभूत झाले. त्यामुळे, आता २०१४ ला येथील उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचं प्रभुत्व असलेल्या या मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत आहेत, जे ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे, ही जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गट लढवणार हे निश्चित मानले जाते. तर, महायुतीकडून भाजपा कि शिंदे गट असा सामना आहे. त्यातच, नारायण राणेंनी ट्विट करुन ही जागा भाजपाच लढवणार असल्याचे स्पष्ट केले. 


''लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.'', असे ट्विट राणेंनी केले. त्यामुळे, राणेंनी एकप्रकारे शिंदे गटाच्या नेत्यांना इशाराच दिला आहे. 

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदर्गची ही जागा शिवसेना-भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला येत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते आणि तसं रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेकदा बोलूनही दाखवले आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा लढण्यासाठी इच्छूक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिवसेनेकडून ठेवून किरण सामंतांना मिळवण्यासाठी उदय सामंतांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच, आता नारायण राणेंनी ट्विट करुन या जागेवर भाजपाचा दावा केला आहे.

Web Title: Narayan Rane struck Shaddu; Big announcement about Ratnagiri-Sindhudurg seat for bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.