नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 05:57 IST2025-07-02T05:56:56+5:302025-07-02T05:57:11+5:30
पटोले विधानसभाध्यक्ष असताना त्यांनी ठरवून दिलेली कारवाई झाली त्यांच्याच विरोधात; मंत्री कोकाटे, लोणीकर यांनी शेतकरीविरोधी वक्तव्यांसाठी माफी मागावी या मागणीवरून गदारोळ

नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
मुंबई : शेतकऱ्यांचा अपमान मंत्री, सत्तारूढ आमदारच करत आहेत, त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत मंगळवारी विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले हे विधानसभेत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिशेने धावत गेले. अध्यक्षांशी त्यांनी वाद घातला, राजदंडाला स्पर्श केला. या गोंधळात पटोले यांना दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित करण्याचे आदेश नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग करीत दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार घातला.
पटोले यांनी शून्य तासात आक्रमक होत मंत्री माणिकराव कोकाटे व भाजपचे ज्येष्ठ सदस्य बबनराव लोणीकर यांनी सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आणि लगेच आसनावर उठून अध्यक्षांच्या आसनाकडे धावले. अध्यक्ष नार्वेकर त्यांना म्हणाले, की तुमची भाषा असंसदीय आहे, जी भाषा आपण वापरली आहे ती योग्य नाही. पटोलेही अध्यक्षांशी वाद घालू लागले आणि तेवढ्यात त्यांनी अध्यक्षांसमोर ठेवलेल्या राजदंडाला हात लावला.
अध्यक्षांवर धावून जाणे योग्य नाही : मुख्यमंत्री
अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, की नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष असताना सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यास काय कारवाई करायची ते ठरविलेले होते. आता मला पुढील कारवाई करण्यास भाग पाडू नका. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवायचे तर मला कारवाई करावीच लागेल, असेही ते म्हणाले. तरीही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणे वेगळे, पण अध्यक्षांवर धावून जाणे हे योग्य नाही. असा प्रकार मी सभागृहात पहिल्यांदाच पाहत आहे. अंगावर धावून जाणे ही कुठली पद्धत आहे, पटोले यांनी माफी मागितली पाहिजे, असे माझे मत आहे.
शेवटी सभागृहाचे कामकाज नियमितपणे चालविण्यासाठी माझ्या अधिकारात मी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करत आहे, असे नार्वेकर यांनी जाहीर केले. त्यावर आधी सभागृहाबाहेर जायला निघालेले पटोले पुन्हा परत आले. विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती. आम्ही सभात्याग करत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आणि विरोधकांनी सभात्याग केला.
जानेवारी ते मार्चदरम्यान ७६७ शेतकरी आत्महत्या
राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत शेतकरी आत्महत्यांची ७६७ प्रकरणे निदर्शनास आली. त्यातील ३७३ पात्र प्रकरणांपैकी ३२७ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. यात २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे, अशी कबुली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली.
सत्तारूढ पक्षाचे आमदार, मंत्रीही उतरले वेलमध्ये
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्योती गायकवाड, अमिन पटेल हे काँग्रेसचे सदस्यही अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले. आक्रमक झालेले सत्तारूढ पक्षाचे आमदार, मंत्रीही वेलमध्ये उतरले आणि पटोले यांनी माफी मागावी, अशी मागणी करू लागले. मंत्री गिरीश महाजन बोलायला उभे राहिले पण गोंधळ अधिकच वाढला. या गोंधळात अध्यक्षांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले.